'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
By ऋचा वझे | Updated: July 10, 2025 12:57 IST2025-07-10T12:56:05+5:302025-07-10T12:57:14+5:30
गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला...

'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाने १० वर्ष अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. गेल्या वर्षीच कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता कार्यक्रमाचं नवं पर्व येत आहे. यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे जुने कलाकार आहेत. तर गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव या नव्या विनोदी कलाकारांची एन्ट्री झाली आहे. मागील पर्वात भाऊ कदम, सागर कारंडे होते ज्यांनी स्त्री भूमिका केल्या. याला लोक नंतर कंटाळले होते. आता नवीन पर्वात काम करताना गौरव मोरेने (Gaurav More) स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का यावर उत्तर दिलं.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरे म्हणाला, "मी काही गोष्टी त्यांना स्पष्ट सांगितल्या आहेत. अजून असं काही ठरलेलं नाही. कलाकार म्हणून माझ्या काही गोष्टी आहेत, मला असं असं हवं आहे का, अमुक करु शकतो असं मी त्यांना विचारलं. झी चा प्रेक्षक वर्ग कसा आहे, त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे बघण्यासाठी मला महिना-दोन महिने तरी लागतील. त्यानंतरच मला अंदाज येईल."
तो पुढे म्हणाला, "लोकांना काय पटतंय काय नाही हे मी बघेन. मग जे पटतंय त्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा मी प्रयत्न करेन. दिग्दर्शकाला काय आवडतंय, चॅनलला काय हवंय, प्रेक्षकांना काय पाहायचंय, तीच गोष्ट लेखक कशा पद्धतीने लिहित आहेत याचं निरीक्षण करुन मला तशा पद्धतीने काम करावं लागेल. यासाठी एक-दोन महिने जातील. करायचं तर विनोदी कामच आहे. पण त्यातही प्रत्येकाचे विचार आणि मानसिकता पाहून मला काम करावं लागेल."
गौरव मोरेला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखलं जातं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे त्याला ओळख मिळाली. मात्र कामात तोचतोचपणा येऊ लागल्याने त्याने ५ वर्षांनंतर हास्यजत्रेचा निरोप घेतला होता. मधल्या काळात काही वेगळी कामं केल्यानंतर आता तो 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात दिसणार आहे.