"गेल्या काही दिवसांत खूप जवळची माणसं..."; लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:21 IST2025-09-01T16:17:51+5:302025-09-01T16:21:38+5:30
लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली-"मन कुठेतरी दुःखी आहे, कारण..."

"गेल्या काही दिवसांत खूप जवळची माणसं..."; लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली...
Shreya Bugde : दरवर्षीप्रमाणे यंदा गणेश चतुर्थीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येकाने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे वातावरण मंगलमय झालं आहे. सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, याच बाप्पााला निरोप देताना अनेकांचा डोळ्यांत अश्रू तरळतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी बाप्पा विराजमान झाले. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अभिनेत्री गणरायाला निरोप देताना ती खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय.
'चला हवा येऊ द्या'फेम श्रेया बुगडेने नुकतीच सोशल मीडियावर सुंदर शब्दांत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. श्रेयाने या पोस्टमध्ये म्हटलंय की, निरोप.......दरवर्षी तुझा निरोप घेताना ऊर भरून येतं माझं. तू जाऊच नयेस असं वाटतं, पण मग हे ही जाणवतं की वर्षभर तू असतोसच की आमच्या हाकेला ‘ओ ’ म्हणायला...आणि त्यात मी, तुझी कधीही पाठ न सोडणारी .एक गोष्ट मात्र ह्या वर्षी दर वर्षी सारखी प्रकर्षाने पुन्हा जाणवली... तुझ्या-माझ्यावर नितांत प्रेम करणारी माणसं घरचा उंबरा काहीही झालं तरी ओलांडतातच, ती येतातच ह्या पाच दिवसात. हीच माझी कमाई आहे आणि म्हणूनच मी खूप श्रीमंत आहे .हाच तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. गप्पा गोष्टी, मोदक, जेवणाच्या पंगती , भजन आरत्या, सगळं घर कसं पाच दिवस नंदनवनसारखं होऊन जातं बघ!!"
त्यानंतर श्रेयाने पुढे लिहिलंय,"पण, गेल्या काही दिवसात माझ्या खूप जवळची काही माणसं, तू तुझ्या घरी बोलावून घेतलीस त्यामुळे मन कुठेतरी दुःखी आहे खूप...पण माझी खात्री आहे की ते जिथे असतील आनंदी असतील आता. मी कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही....न मागतच तू खूप दिलयस....पण ह्या वर्षी मात्र सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य तुझ्याकडे मागतेय तेवढं मात्र कर बाप्पा, सगळ्यांना सुदृढ, निरोगी ठेव बस्स. बाकी तुझा आशीर्वाद आहेच.असाच ये आता पुढच्या वर्षी, आनंद घेऊन ,सेवा करून घ्यायला....बरं आमच्याकडून तुझ्या सेवेत काही राहिलं असेल, चूक झाली असेल तर पोटात घे रे! सुखरूप पोहोच आणि तू पण काळजी घे...आम्हा लेकरांवर लक्ष्य ठेव.तुला खूप प्रेम बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर ये ....आम्ही वाट बघतोय ...! अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.