डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:52 IST2025-07-22T10:51:41+5:302025-07-22T10:52:47+5:30
तशीच स्टाईल, तसाच आवाज...निलेश साबळे यावेळी स्टार प्रवाहवर

डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
नमस्कार..मी डॉ निलेश साबळे (Dr Nilesh Sabale) असं म्हणत अखेर साबळे पुन्हा टीव्हीवर आले आहेत. गेल्या वर्षी 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर निलेश साबळे पुन्हा कुठेही दिसला नाही. पण आता निलेशने झी मराठी नाही तर स्टार प्रवाह वर दमदार एन्ट्री घेतली आहे. या वाहिनीवरील 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात अमेय वाघच्या जोडीला निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव आले आहेत. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.
'शिट्टी वाजली रे' कार्यक्रम गेल्या दोन महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये स्पर्धकांना कुकिंग चॅलेंज देण्यात येतं. अमेय वाघने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. निक्की तांबोळी, माधवी निमकर, विजय पाटकर, धनंजय पोवार, विनायक माळी असे अनेक स्पर्धक दिसले. स्वयंपाक करत मस्ती मजा अशी शोची संकल्पना होती. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अमेय वाघसह स्टार प्रवाहवरच 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधवही महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावणार आहे. तर प्रेक्षकांना मिळालेलं सरप्राईज म्हणजे डॉ निलेश साबळेही या अंतिम सोहळ्यात सामील झाले आहेत. 'नमस्कार, सुस्वागतम मी डॉ निलेश साबळे..सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या लोकप्रिय खाद्य महोत्सवात ज्याचं नाव आहे शिट्टी वाजली रे 'म्हणत त्यांनी एन्ट्री घेतली आहे.
स्टार प्रवाहवर एन्ट्री घेतल्यानंतर निलेश म्हणाला, "स्टार प्रवाहसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मी या वाहिनीवरचे अनेक कार्यक्रम पाहत आलोय. शिट्टी वाजली रे आणि आता होऊ दे धिंगाणा हे दोन्ही माझ्या आवडीचे कार्यक्रम आहेत. वाहिनीने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने मला विचारलं त्यामुळे नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. शिट्टी वाजली रे च्या मंचावरचा दिवस अगदीच मजेशीर होता. मला स्वयंपाक येत नाही. माझ्यासोबत सुपर्णा श्याम होती. तिच्या मदतीने मी पदार्थ बनवू शकलो. स्टार प्रवाह परिवारात माझा प्रवेश झालाय याचा मला अतिशय आनंद होत आहे."
'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यामध्ये निलेश साबळे सूत्रसंचालन करताना दिसणार नाही. त्याजागी अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. निलेश साबळेंना झी मराठीने डच्चू दिला अशीही चर्चा झाली. मात्र निलेशने त्याचं खंडन केलं. सिनेमात व्यस्त असल्याने कार्यक्रमाला वेळ देता येणार नसल्याचा त्याने खुलासा केला होता.