तुम्हाला माहीत आहे का बिग बॉसच्या घरात असूनही स्पर्धक भेटतात या बाहेरच्या लोकांना... वाचा सविस्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 12:51 IST2018-07-23T12:35:33+5:302018-07-23T12:51:55+5:30
बिग बॉस फिनालेची घोषणा झाल्यानंतर त्याची जय्यत तयारी घराच्या बाहेर सुरू असते. पण त्याचसोबत घरामध्ये देखील तयारी सुरू झालेली असते. फायनलमध्ये असणारे स्पर्धक फिनालेच्या तयारीला लागलेले असतात.

तुम्हाला माहीत आहे का बिग बॉसच्या घरात असूनही स्पर्धक भेटतात या बाहेरच्या लोकांना... वाचा सविस्तर
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमाची मेघा धाडे ही विजेती ठरली असून तिला १८ लाख ६० हजारची धनराशी मिळाली आहे. मेघा ही प्रेक्षकांची लाडकी स्पर्धक असल्याने ती जिंकल्याचा स्पर्धकांना खूपच आनंद झाला आहे. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक आठवड्यात स्पर्धक काही ना काही टास्क करताना दिसतात. पण शेवटच्या आठवड्यात कधीच टास्क नसतात. शेवटच्या आठवड्यात स्पर्धकांना टास्क का दिले जात नाही यामागे एक खास कारण असते. स्पर्धकांना टास्क का दिला जात नाही याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बिग बॉस फिनालेची घोषणा झाल्यानंतर त्याची जय्यत तयारी घराच्या बाहेर सुरू असते. पण त्याचसोबत घरामध्ये देखील तयारी सुरू झालेली असते. फायनलमध्ये असणारे स्पर्धक फिनालेच्या तयारीला लागलेले असतात. फिनालेला काही दिवस बाकी असताना त्यांचा मेक ओव्हर केला जातो. तसेच फिनालेला कोणता स्पर्धक काय परफॉर्म करणार याची तालीम केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या काही दिवसांत तालमी करण्यासाठी अथवा स्पर्धकांचे मेक ओव्हर करण्यासाठी बाहेरील काही लोक देखील बिग बॉसच्या घरात जातात.
बिग बॉस मराठीच्या फिनालेमधील स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स पाहून काल नक्कीच लोकांना आश्चर्य वाटले असेल... या लोकांचा मेकअप कोणी केला, स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहाताना सगळ्या डान्सची कोरिओग्राफी केल्यासारखे वाटत होते. त्यामुळेच फिनाले पाहाणाऱ्या लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असताना देखील स्पर्धकांचे नृत्य कोणी बसवले, त्यांचा मेकअप कोणी केला यांसारखे अनेक प्रश्न लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत.
बिग बॉस हिंदीमध्ये देखील फिनालेची तयारी काही दिवस आधीच सुरू झालेली असते. तसेच फिनालेला काय घालणार याबाबत देखील स्पर्धकांसोबत चर्चा केली जाते. त्यामुळे शेवटचा आठवडा हा इतर आठवड्यांपेक्षा खूपच वेगळा असतो. शेवटच्या आठवड्यापर्यंत बिग बॉसमधील स्पर्धकांचा बाहेरच्या जगाशी, तेथील लोकांशी काहीही संपर्क नसतो. पण शेवटच्या काही दिवसांत बिग बॉस सोबतच बाहेरच्या जगातील काही लोकांशी देखील त्यांचे बोलणे होते असे म्हटले जाते.