दादा कोंडकेंचा या सिनेमात नाहीये त्यांचा एकही डायलॉग; कॉमेडी किंगने प्रेक्षकांना लोटपोट हसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 07:01 PM2023-11-02T19:01:52+5:302023-11-02T19:02:37+5:30

नव्या पिढीला दादा कोंडके यांच्या सिनेमातील साधेपणा आणि दादांची गाणी, डान्स हे सगळं हटके वाटत असल्यामुळे दादांच्या प्रत्येक सिनेमाने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात बाजी मारली आहे.

Dada kondke marathi movie muka ghya muka will be on air on zee talkies | दादा कोंडकेंचा या सिनेमात नाहीये त्यांचा एकही डायलॉग; कॉमेडी किंगने प्रेक्षकांना लोटपोट हसवले

दादा कोंडकेंचा या सिनेमात नाहीये त्यांचा एकही डायलॉग; कॉमेडी किंगने प्रेक्षकांना लोटपोट हसवले

दादा कोंडकेंचा एकही संवाद नसताना पोट दुखेपर्यंत हसा.मराठी सिनेमात विनोदाचं रसायन सापडलेले विनोदवीर म्हणजे दादा कोंडके. ऐतिहासिक सिनेमांचा काळ मागे पडला होता. तमाशापटांची जादू काहीशी ओसरली होती. मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पहायचं होतं. तेव्हा दादा कोंडके यांनी विनोदी सिनेमांचं पर्व सुरू केलं. १९८० नंतर मराठी पडद्यावर अस्सल गावरान कथा, तितकाच भोळा नायक, मराठी मातीतली गाणी आणि निखळ मनोरंजन करणारे संवाद अशी भट्टी दादा कोंडके यांनी जमवली. दादा कोंडके यांचा सिनेमा पडद्यावर आला की तो किमान २५ आठवडे तरी चालणारच असं एक समीकरणच झालं होतं. आजही दादांचा सिनेमा पहायला मिळणार म्हटलं की दादांचे चाहते उत्साही होतात.
 
 झी टॉकीज वाहिनीने खास दादांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची भेट घरबसल्या आणली आहे. दादांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा रविवार दि. ५ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना  झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे. दादांचे संवाद नेहमीच हिट झाले आहेत, पण या सिनेमात एक डायलॉगही न बोलता प्रेक्षकांना लोटपोट हसवणाऱ्या अवलिया दादांची कमाल अनुभवता येणार आहे. 
 
झी टॉकीज वाहिनीने दादा कोंडके यांच्या सिनेमांची मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमांचा चाहता वर्ग आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. या पिढीने दादांचे सिनेमे थिएटरमध्ये पाहिले आहेत. नव्या पिढीला दादा कोंडके यांच्या सिनेमातील साधेपणा आणि दादांची गाणी, डान्स हे सगळं हटके वाटत असल्यामुळे दादांच्या प्रत्येक सिनेमाने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात बाजी मारली आहे. 
 
झी टॉकीज वाहिनीने दादांच्या स्मृती जागवण्यासाठी घरबसल्या दादांचे सिनेमे प्रदर्शित करण्याचा संकल्प केला आहे. याच मालिकेत दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही एव्हरग्रीन जोडी असलेला ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा पाहता येणार आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाचे शीर्षक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सिनेमाच्या शीर्षकापासूनच प्रेक्षकांच्या मनसोक्त हसण्याचा प्रवास सुरू होतो तो थेट सिनेमाच्या क्लायमॅक्सपर्यंत. ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमाही याच पठडीतला. या सिनेमातील नायकाचे नाव मुक्या आणि त्याला बोलता येत नसल्याने सारं गाव त्याला “मुका मुका” अशीच हाक मारत असते. तर दादांच्या रूपातील हा मुका नायक सिनेमात एकही डायलॉग न बोलता प्रेक्षकांना हसून कसा बेजार करतो याची धमाल पाहणे हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक रविवार ठरणार आहे. करमणूक आणि प्रबोधन करणारा हा सिनेमा म्हणजे दादा कोंडके यांच्या दिग्दर्शन आणि अभिनयाची कमाल आहे. कथा पटकथा, गीतलेखन, अभिनय असा सगळा किल्ला दादांनी लढवल्याने या सिनेमाला असलेला दादांचा टच प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 
 

Web Title: Dada kondke marathi movie muka ghya muka will be on air on zee talkies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.