सैफ अली खानच्या सिनेमात करणार होता काम, आगीत गेला बालकलाकाराचा जीव; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:56 IST2025-09-29T09:56:28+5:302025-09-29T09:56:59+5:30
राजस्थानमधील कोटामधील अनंतपुरा परिसरात असलेल्या दीप श्री अपार्टमेंट संकुलात भीषण आग लागल्याने दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. या आगीच्या घटनेत १० वर्षीय बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा १५ वर्षीय भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला.

सैफ अली खानच्या सिनेमात करणार होता काम, आगीत गेला बालकलाकाराचा जीव; नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील कोटामधील अनंतपुरा परिसरात असलेल्या दीप श्री अपार्टमेंट संकुलात भीषण आग लागल्याने दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, या आगीच्या घटनेत १० वर्षीय बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा १५ वर्षीय भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला.
एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, आग इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली, त्यावेळी दोन्ही मुले घरात एकटी होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये झपाट्याने पसरलेल्या दाट धुरामुळे गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमधून धूर बाहेर पडताना पाहिला आणि मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून बेशुद्ध पडलेल्या मुलांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संपूर्ण ड्रॉइंग रूम जळून खाक
प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, "आगीमुळे ड्रॉइंग रूम पूर्णपणे जळून खाक झाला आणि फ्लॅटच्या इतर भागांनाही आगीमुळे नुकसान झाले आहे." स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनीही या घटनेचे कारण विजेतील बिघाड असल्याचे दुजोरा दिला.
सैफच्या सिनेमात वीर करणार होता काम
वीर आणि शौर्य हे अभिनेत्री रीता शर्मा आणि कोटा येथील एका प्रमुख कोचिंग संस्थेचे प्राध्यापक जितेंद्र शर्मा यांची मुलं होते. दुर्घटनेच्या वेळी जितेंद्र एका कार्यक्रमासाठी शहरात गेले होते, तर रीता मुंबईत होत्या. वीरने पौराणिक टीव्ही मालिका 'श्रीमद् रामायण' मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आगामी चित्रपटात सैफ अली खानच्या बालपणीची भूमिका साकारण्यासाठीही त्याची निवड झाली होती. त्याचा मोठा भाऊ शौर्य एक हुशार विद्यार्थी होता आणि आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करत होता.
वडिलांनी घेतला मुलांच्या नेत्रदानाचा निर्णय
या घटनेनंतर, दुःखी झालेल्या त्यांच्या वडिलांनी दोन्ही मुलांचे नेत्रदान करण्याचा कुटुंबाचा निर्णय जाहीर केला. रीता शर्मा या 'क्रॅश कोर्स' (२०२२), 'क्राइम्स अँड कन्फेशन्स' (२०२१) आणि 'चाहतें' (२०२५) यांसारख्या कामांसाठी ओळखल्या जातात.