"तेव्हा लोकांना वाटलेलं मला एक पायच नाही", भार्गवी चिरमुलेने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 02:10 PM2023-10-25T14:10:22+5:302023-10-25T14:11:05+5:30

'एका पेक्षा एक' या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वाची भार्गवी विजेती ठरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भार्गवीने शोचा एक किस्सा सांगितला. 

bhargavi chirmule talk about childhood leg surgery shared eka peksha ek reality show experirnce | "तेव्हा लोकांना वाटलेलं मला एक पायच नाही", भार्गवी चिरमुलेने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली...

"तेव्हा लोकांना वाटलेलं मला एक पायच नाही", भार्गवी चिरमुलेने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली...

भार्गवी चिरमुले ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. आजवर नाटक, मालिका आणि सिनेमांतून भार्गवीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अभिनेत्री असण्याबरोबरच भार्गवी एक उत्तम डान्सरही आहे. 'एका पेक्षा एक' या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. या शोमुळे भार्गवी प्रसिद्धीझोतात आली होती. तिच्या चाहत्या वर्गात 'एका पेक्षा एक'मुळे वाढ झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भार्गवीने शोचा एक किस्सा सांगितला. 

"माझ्या पायाचं लहानपणी ऑपरेशन झालं होतं. तेव्हा एवढी अॅडव्हान्स टेक्नोलॉजी नव्हती. त्यामुळे डॉक्टर म्हणाले होती की ही आता चालू शकेल की नाही माहित नाही. पण, या मुलीला आपण वाचवूया. त्यानंतर खूप वर्षांनी ते मला एका कार्यक्रमात भेटले. योगाचा डिप्लोमा मी केला होता. तेव्हा त्यांच्या हातून मला बक्षीस मिळालं होतं. तेव्हा त्यांना मी हे सांगितलं होतं. त्यांना आठवणं शक्य नव्हतं.  ते म्हणाले की मला आठवत नाहीये. पण, मला आनंद झाला की माझं ते विधान खोटं ठरलं. हा किस्सा मी एका पेक्षा एकमध्ये सांगितला होता. त्या शोमध्ये मी एका पायावर डान्स करत अशा लोकांना ट्रिब्युट दिलं होतं. ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते," असं तिने मीडिया टॉक या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, "त्यानंतर अनेक लोकांना मला एक पाय नाहीच आहे, हे खरंच वाटलं होतं. या डान्सनंतर माझी मावशी एका मंदिरात गेली होती. तिथे देवळात बायका गप्पा मारत होत्या. बिचारीला एक पायच नाही, असं त्या बायका म्हणाल्या. त्यावर माझ्या मावशीने त्यांचं संभाषण थांबवत त्यांना सांगितलं की असं नाहीये. ती जे बोलली त्याचा अर्थ असा नव्हता. लहानपणी तिच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. तिने त्या लोकांना ट्रिब्युट दिलं जे या वेदनेतून जात आहेत आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. पण, त्या डान्स परफॉर्मन्सनंतर अनेकांना असं वाटलं होतं की मला एक पाय नाही." 

अभिनेत्री आणि डान्सर असण्याबरोबरच भार्गवी एक योगा ट्रेनरही आहे. नुकतंच तिने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. भार्गवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

Web Title: bhargavi chirmule talk about childhood leg surgery shared eka peksha ek reality show experirnce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.