ओंकार भोजनेने केली भरत जाधव यांची मिमिक्री, थेट मिळाली सोन्याची अंगठी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 15:28 IST2024-07-14T15:27:34+5:302024-07-14T15:28:01+5:30
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या विनोदी कार्यक्रमात ओंकार भोजनेने भरत जाधव यांची सर्व गाजलेली पात्र सादर केली. तेव्हा भरत जाधव यांनी काय केलं बघा.

ओंकार भोजनेने केली भरत जाधव यांची मिमिक्री, थेट मिळाली सोन्याची अंगठी; Video व्हायरल
भरत जाधव (Bharat Jadhav) म्हणजे मराठीतील अफलातून कलाकार. 'श्रीमंत दामोदर पंत', 'गलगले' सारखी अनेक त्यांची अनेक पात्र गाजली. आजही भरत जाधव प्रेक्षकांचं तेवढंच मनोरंजन करतात. पण जेव्हा भरत जाधव यांच्यासमोर त्यांचीच नक्कल करणारा तेवढाच तगडा कलाकार येतो तेव्हा काय होतं? 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या विनोदी कार्यक्रमात ओंकार भोजनेने (Onkar Bhojane) भरत जाधव यांची सर्व गाजलेली पात्र सादर केली. तेव्हा भरत जाधव यांनी काय केलं बघा.
हसताय ना? हसायलाच पाहिजे कार्यक्रमात निलेश साबळेंसह ओंकार भोजने आणि भाऊ कदम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आगामी एपिसोडमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेते भरत जाधवही आहेत. कलर्स मराठीने नुकताच एपिसोडचा प्रोमो शेअर केला. यामध्ये ओंकार भोजने भरत जाधव यांचे गाजलेले पात्र साकारताना दिसतोय. त्याच्या विनोदावर सगळेच खळखळून हसत आहेत. अगदी भरत जाधव यांना स्वत:लाही स्टेजवरुन जाऊन त्याचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. त्याला पाहून ते खूप भावुक झाले आणि त्यांनी बोटातली सोन्याची अंगठी काढून ती ओंकार दिली. हा क्षण खूपच भावुक करणारा आहे.
ओंकार भोजने सर्वांचा लाडका कलाकार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून तो घराघरात पोहोचला. यानंतर त्याने काही सिनेमांमध्येही काम केलं. 'करुन गेलो गाव' या नाटकाचे प्रयोगही तो करतो. तर आता 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. भरत जाधव यांच्याकडून मिळालेली ही अंगठी त्याच्यासाठी आयुष्यभराचं गिफ्ट आहे. चाहत्यांनीही त्याच्यावर गर्व असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.