Ekta Sharma : जगण्यासाठी संघर्ष! घर चालवण्यासाठी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कॉल सेंटरमध्ये करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:23 IST2022-09-19T15:14:12+5:302022-09-19T15:23:05+5:30
Ekta Sharma : एकताने तिच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. त्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली. 2020 मध्ये बेपनाह प्यार या मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तिला कामच मिळालं नाही.

Ekta Sharma : जगण्यासाठी संघर्ष! घर चालवण्यासाठी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कॉल सेंटरमध्ये करतेय काम
एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’ आणि ‘बेपनाह प्यार’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री एकता शर्मा (Ekta Sharma) आठवतेय का? एकता आता बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. याच दरम्यान तिला कोणत्याही मालिकेत कुठलंही काम मिळत नव्हतं. शेवटी घर चालवण्यासाठी तिने एका कॉल सेंटरमध्ये (Call Center) काम करण्यास सुरुवात केली. एकता शर्मा सध्या तिच्या आईसोबत भाड्याच्या घरात राहते.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एकताने तिच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. त्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली. 2020 मध्ये बेपनाह प्यार या मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तिला कामच मिळालं नाही.
एकता शर्मा म्हणाली, "मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. फक्त घरी बसून अभिनयाची चांगली संधी येण्याची मी वाट पाहू शकत नव्हती. मला माझं काम आवडतं आणि मला लवकरच अभिनयक्षेत्रात परत यायचं आहे. मी सतत ऑडिशन्स आणि लुक टेस्ट देत असते. मला आशा आहे की लवकरच काहीतरी चांगलं होईल."
एकता केवळ तिच्या करिअरमध्येच संघर्ष करत नाही तर तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ती सध्या तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या पालकत्वासाठी न्यायालयात लढा देत आहे. कठीण परिस्थितीतही तिने आशा सोडलेली नाही. लवकरच सर्व काही सुरळीत होईल असा तिला विश्वास आहे.
"कॉल सेंटरमध्ये काम करणं ही वाईट गोष्ट नाही. पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दोन दशकं काम करूनही आज मला काम मिळत नाही हे खूप दुःखद आहे. मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे की त्यांनी मला अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी माझं शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्याच जोरावर मी इतर क्षेत्रात आज पैसे कमावू शकतेय."
"मला टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांवर नाराज आहे, जे मदतीसाठी पुढे येत नाहीत आणि कामही देत नाहीत" अशीही खंत तिने व्यक्त केली. एकता शर्माने 1998 मध्ये सीआयडीमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण 2001 मध्ये कुसुम या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. यानंतर ती एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये दिसली.