‘इंडस्ट्रीत नाव कमवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा’ - पलक जैन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:56 PM2018-03-23T12:56:01+5:302018-03-23T18:45:22+5:30

अबोली कुलकर्णी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘ये प्यार नहीं तो क्या है?’ या नव्या हिंदी मालिकेत अभिनेत्री पलक जैन ही ...

Believe in yourself if you want to make a name in the industry '- Palak Jain | ‘इंडस्ट्रीत नाव कमवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा’ - पलक जैन

‘इंडस्ट्रीत नाव कमवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा’ - पलक जैन

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘ये प्यार नहीं तो क्या है?’ या नव्या हिंदी मालिकेत अभिनेत्री पलक जैन ही अनुष्का रेड्डीची भूमिका साकारत आहे. मालिकेतून सिद्धांत आणि अनुष्का यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या निमित्ताने पलक जैन हिच्याशी संवाद साधता आला. ‘टीव्ही इंडस्ट्रीत काम करताना स्ट्रगलर्सनी धीर सोडू नये. स्वत:वर विश्वास ठेवावा,’ असे मत तिने मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. 

*  ‘ये प्यार नही तो क्या हैं’ या मालिकेत तू अनुष्का रेड्डीची भूमिका केली आहेस. कशी आहे अनुष्का? आणि या भूमिकेसाठी तुला कोणती खास तयारी करावी लागली?
- अनुष्का आणि मी तितकेसे वेगळे नाही. कारण ती आजच्या युगाची मुलगी आहे. सशक्त, स्वतंत्र, भावनाशील आणि स्थिर. आश्चर्य म्हणजे ती महत्त्वाकांक्षी आणि समंजस देखील आहे. त्याचप्रमाणे, माझ्या देखील आकांक्षा आहेत पण जमिनीशी माझे नाते कधीच सुटत नाही. तयारीबाबत सांगायचे तर, होय, चित्रीकरणापूर्वी काही कार्यशाळा झाल्या, ज्यामुळे मला या व्यक्तिरेखेचा आणि तिच्या लकबीचा सखोल अभ्यास करण्यास मदत झाली. मला असे वाटते की, शिकणे कधीच थांबत नाही. तुम्ही काम सुरू करता तेव्हा प्रत्येक टेकबरोबर तुम्ही शिकत जाता व तुमच्यात सुधारणा होत जाते. त्यामुळे मी असे म्हणू शकते की, तयारी करणे ही न संपणारी प्रक्रिया आहे.

* अनुष्काच्या व्यक्तिरेखेसाठी तू भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहेस. कसा होता अनुभव?
- होय. मी अनुष्काच्या व्यक्तिरेखेसाठी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. यापूर्वी कधीही मी कुठलाच डान्सफॉर्म शिकला नव्हता. मालिकेच्या निमित्ताने मला भरतनाट्यमसाठी काही कार्यशाळांमधून शिक्षण घ्यायला मिळाले. शूटिंगदरम्यान किंवा शूटिंग झाल्यानंतरही कधी कधी मला भरतनाट्यमवर काम करावं लागलं. पण, हा डान्सफॉर्म शिकताना खरंच खूप मजा आली. हा डान्सप्रकार शिकायला खूप कठीण आहे.

* मालिकेबद्दल काय सांगशील? आणि सेटवरचे काही किस्से शेअर करशील का?
- मालिकेची गोष्ट ही आजच्या पिढीची आहे, जी सतत शॉर्टकट शोधत असते व फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये जगत असते. आपल्याला सर्व काही झटपट हवे असते आणि हीच वृत्ती आपल्या नात्यांमध्येही दिसते. नात्यांमध्ये छोटे छोटे मतभेद हे नेहमीच असतात. या मालिकेत दोन व्यक्ती अनुष्का आणि सिद्धांत यांची गोष्ट आहे, जे एकत्र आहेत पण त्यांच्यातील समस्यांच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवण्याऐवजी ते समस्या तशाच अधांतरी सोडून देतात किंवा त्याबद्दल बोलण्याचेच टाळतात आणि पुढे जाण्याचे ठरवतात. अशा छोट्या छोट्या घटना एकत्र होऊन त्यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते आणि त्या समस्या आणखीनच गुंतत जातात. पण जेव्हा भौतिक यश मिळते तेव्हा ते शेअर करण्यासाठी जर कोणी आपले माणूस नसेल तर सारे कसे व्यर्थ वाटते याचा शोध या मालिकेतून घेतला आहे. प्रेमाची ती छटा आहे जी आजवर अव्यक्त राहिली असली तरी अजून धडधडते आहे, अव्यक्त असली तरी जाणवणारी आहे. ही सिद्धान्त सिन्हा (नमित खन्ना) आणि अनुष्का रेड्डी (पलक जैन) यांची गोष्ट आहे. मालिकेचे शूटिंग दिल्लीत सुरू असून संपूर्ण सेट-अप तिथेच लावण्यात आलेला आहे. 

* अभिनय हे क्षेत्र करिअर म्हणून कसे निवडले?
- काही काळापासून मी जाहिराती, टेलिव्हिजन मालिका, वेब शो आणि चित्रपटांसाठी आॅडिशन देत होते. कॉलेजच्या दिवसांपासूनच मला फॅशन, मॉडेलिंग यांची खूप आवड होती. मग मॉडेलिंगसाठी मी अनेकदा आॅडिशन्स दिले. त्यानंतर मला जाणवले की, मी याच क्षेत्रात प्रोफेशनली काम का करू नये? माझी जर्नी पूर्णपणे आकस्मिक होती. 

* अभिनयाच्या क्षेत्रात तू कुणाला स्वत:चा गुरू मानतेस?
- बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांना मी आदर्शस्थानी मानते. मला कंगना राणौत, दीपिका पादुकोण यांचं काम, कामाप्रती त्याग आणि समर्पणवृत्ती खूप आवडते. त्यांनीही या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे आज त्या या जागेवर आहेत. आमिर खानचाही अभिनय मला खूप आवडतो. 

* अभिनयाची तुझी व्याख्या काय?
- अभिनय ही एक कला आहे. ती प्रत्येकांत नसते. ती आपसूकच स्वत:मध्ये लहानपणापासून विकसित व्हावी लागते. माझ्यात ही अभिनयाची कला होती. मी तिला विकसित करण्यासाठी अनेक वर्कशॉप्स केले. एका वर्कशॉपमध्ये आमच्या शिक्षकांनी मला सांगितले की,‘तू ज्याचा अभिनय करणार आहेस त्याचे व्यक्तिमत्त्व जगले पाहिजेस. तरच तुला उत्तम अभिनय करता येईल.’ हेच तत्त्व उराशी बाळगत माझा अभिनयप्रवास सुरू आहे.

* जर तू अभिनेत्री नसतीस तर तू कोणत्या क्षेत्रात करिअर केले असतेस?
- मी जर अभिनय क्षेत्रात नसते तर मी नक्कीच फॅशन वर्ल्डमध्ये असले असते. मी फॅशन संदर्भातील एक कोर्स केला होता. मी नक्कीच आत्ता एखाद्या कॉर्पाेरेट आॅफिसला काम क रत असले असते. पण, त्यापेक्षा मी आज माझ्या कामामुळे जास्त आनंदी आहे.

* आगामी पाच वर्षांत तू स्वत:ला कुठे पाहू इच्छितेस?
- असं मी काही ठरवलेलं नाही अजून. पण, होय मी आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगू इच्छिते. काहीतरी नवीन शिकण्याची माझी जिद्द आहे. मी एक कलाकार म्हणून माझ्यातल्या सर्व कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करेन. एक कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे माझे कर्तव्य आहे, त्यासाठी मी नक्कीच परिश्रम घेणार.

* जर तुला बॉलिवूडमधून आॅफर मिळाली तर तू कुणासोबत काम करू इच्छितेस?
- मी आमिर खान यांच्यासोबत काम करू इच्छिते. कारण त्यांचे कामाप्रती असलेले समर्पण, त्याग या सर्व गोष्टी मला खूप आवडतात. त्यांच्यासोबत जर काम करायला मिळालं तर नक्कीच मला बरंच काही शिकायलाही मिळेल. 

* इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या  अनेक स्ट्रगलर्सना तू कोणता संदेश देशील?
- स्वत:वर आणि स्वत:च्या टॅलेंटवर कायम तुमचा विश्वास असला पाहिजे. तुम्ही हिंमत हारू नका. यश-अपयश हे येत-जात राहते. मात्र, अखंड परिश्रमाने तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्ही मिळवाच. फक्त धीर सोडू नका. 

Web Title: Believe in yourself if you want to make a name in the industry '- Palak Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.