"तुला जाऊन १ वर्ष झालं, पण...", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 04:38 PM2024-04-14T16:38:13+5:302024-04-14T16:39:44+5:30

"तू या जगात नाहीस...", अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट

apurva nemlekar shared emotional post for her brother who died of heart attack one year ago | "तुला जाऊन १ वर्ष झालं, पण...", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक

"तुला जाऊन १ वर्ष झालं, पण...", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक

अपूर्वा नेमळेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अपूर्वा छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा आहे. 'आभास हा' मालिकेतून अभिनयात पदार्पण केलेल्या अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील शेवंताने अपूर्वाला घराघरात पोहोचवलं. अपूर्वाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अपूर्वा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती चाहत्यांना देत असते. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. गेल्यावर्षी अपूर्वाच्या भावाचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणीत अपूर्वा भावुक झाली आहे. "भाऊ तू मला स्ट्राँग राहायला शिकवलंस...पण, मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीये. तू या जगात नाहीत याचा स्वीकार करण्याइतपत मी स्ट्राँग नाही. तुला जाऊन १ वर्ष झालं. पण, असा एकही दिवस गेला नाही की मला तुझी आठवण आली नाही. भाई, आय मिस यू अँड आय लव्ह यू", असं म्हणत अपूर्वाने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकर याचं गेल्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं. तो अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अपूर्वाने सोशल मीडियावरुन याची माहिती चाहत्यांना दिली होती. 

सध्या अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अपूर्वा 'बिग बॉस मराठी ४'मध्ये सहभागी झाली होती. या पर्वाच्या टॉप २ फायनलिस्टमध्ये तिने जागा मिळवली होती.

Web Title: apurva nemlekar shared emotional post for her brother who died of heart attack one year ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.