प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट, 'मी संसार माझा रेखिते' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:27 IST2025-12-01T18:27:13+5:302025-12-01T18:27:53+5:30
'मी संसार माझा रेखिते' मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर, अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट, 'मी संसार माझा रेखिते' मालिकेत
'सन मराठी'वर 'मी संसार माझा रेखिते' ही नवी मालिका आज म्हणजेच १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर, अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अभिनेत्री आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, पूजा महेंद्र, अभिनेता संदीप गायकवाड, वेद आंब्रे या कलाकारांमुळे मालिकेत आणखी रंगत वाढणार आहे. नुकतीच या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. मालिकेचा विषय हा प्रत्येक गृहिणीला आपलंस करून घेणारा आहे. आजच्या काळातही बऱ्याच महिला अनुप्रिया सारखं आयुष्य जगत आहेत. प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबासाठी काही न काही ऍडजस्टमेन्ट करत असते. आज काळ पुढे गेला आहे पण माणसांची विचारसरणी जुनीच आहे असं म्हणायला हरकत नाही. मालिकेतून स्त्रीला आणखी सक्षम कसं करता येईल हा प्रयत्न असणार आहे.
अनुप्रिया ही संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी आहे. अनुप्रियाचा प्रेमविवाह झाला असून गेली १७ वर्ष तिच्या बाबांनी तिला स्वीकारलं नाही आहे. तिच्या सासरच्या मंडळींचा देखील तिला पाठिंबा मिळत नाही. पण या सगळ्यात अनुप्रिया हसतमुखाने तिच्या जवळच्या माणसांसाठी त्यांच्या आवडी- निवडी जपत असते. मालिकेत अनुप्रियाच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम तिची मुलगी पिहू करत असते. आता कुटुंबाला सांभाळत अनुप्रिया तिच्या स्वप्नांसाठी कशी उभी राहणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. एकंदरीतच प्रत्येक कुटुंबाला आपलंस करून घेणारी ही अनुप्रियाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांना मालिकेच्या पहिल्या भागाची ओढ लागली आहे. याचसह मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांसाठी सर्वत्र प्रदर्शित केलं आहे.
"ही गोष्ट फक्त अनुप्रियाची नसून प्रत्येक घरातील स्त्रीची आहे"
अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर या मालिकेबद्दल म्हणाली की, "एक गृहिणी तिच्या संसारासाठी अडजस्टमेंट तिच्याच जवळच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी करत असते. 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेतून स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे इतकंच न दाखवता तिच्या समोर येणाऱ्या प्रसंगांना तिने कशाप्रकारे तोंड दिलं पाहिजे, आपला संसार आणखी कसा सुखी करता येईल हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही गोष्ट फक्त अनुप्रियाची नसून प्रत्येक घरातील स्त्रीची आहे."