"मराठीबद्दल प्रेम, पण हिंदी ही देशाची मातृभाषा..." हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:59 IST2025-07-10T17:58:49+5:302025-07-10T17:59:45+5:30
हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा यांनी मत व्यक्त केलं.

"मराठीबद्दल प्रेम, पण हिंदी ही देशाची मातृभाषा..." हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा म्हणाले...
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला. पण, त्या निर्णयापासून सुरू झालेला विरोध हा हिंदी-मराठी वादापर्यंत येऊन पोहोचला आहे.या वादावर आता मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता ज्येष्ठ गायक आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
अनुप जलोटा यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये सर्व भाषांचा सन्मान करवा असं म्हटलं. त्यांनी मराठी भाषेबद्दल प्रेम केलं आणि हिंदीला मातृभाषेचा दर्जा दिला. ते म्हणाले, "आपल्या देशासाठी प्रत्येक भाषा खूप महत्त्वाची आहे. मला मराठी खूप आवडते. मी मराठीत गाणीही गातो. हिंदी ही आपल्या देशाची मातृभाषा आहे, म्हणून ती सर्वत्र बोलली जाते. पण जर एखाद्याला अधिक भाषा बोलता आणि समजता येत असतील, तर ती फार चांगली गोष्ट आहे. इतर भाषा शिका, बोला आणि आपली मातृभाषा हिंदीही बोला".
भजनसम्राट अशी ओळख असलेले अनुप जलोटा गेली अनेकवर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. गाणी, गझल, चित्रपट गीते गाऊन त्यांनी गायन क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळवले आहे. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. अनुप जलोटा हे बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रचंड चर्चेत आले होते. २०१८ मध्ये 'बिग बॉस' सीझन १२ मध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी शोमध्ये जसलीन मथारू हिच्यासोबत जोडीनं प्रवेश केला होता, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनीच अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या प्रेमकरणाचा घाट घातला होता. या अजब गजब जोडीची मात्र सर्वत्रच चर्चा झाली होती. पण काही काळानंतर जलोटा यांनी हे स्पष्ट केलं की, "मी जसलीनला फक्त एक विद्यार्थीनी मानतो. आमच्यात प्रेमसंबंध नव्हते".