वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी KBCमध्ये करोडपती झालेला स्पर्धक बनला IPS अधिकारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 20:43 IST2022-08-05T20:41:44+5:302022-08-05T20:43:18+5:30
Kaun Banega Crorepati: २००१ साली ‘केबीसी’मध्ये एका चिमुरड्याने १ कोटी जिंकण्याचा मान पटकावला होता. आज हा चिमुरडा आयपीएस अधिकारी बनला आहे.

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी KBCमध्ये करोडपती झालेला स्पर्धक बनला IPS अधिकारी!
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC)मुळे कित्येक लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या शोमध्ये मिळालेल्या रक्कमेसोबतच त्यांना ओळखदेखील मिळाली. या शोमध्ये जिंकलेल्या कित्येक लोकांच्या इंटरेस्टिंग स्टोरी समोर आल्या. अशीच एक स्टोरी सध्या चर्चेत आली आहे. २००१ साली कौन बनेगा करोडपतीचा स्पेशल सीझन आला होता ज्याचं नाव होतं केबीसी ज्युनिअर. या शोमध्ये अवघ्या १४ वर्षांचा मुलगा रवि मोहन सैनीने सर्व पंधरा प्रश्नांची अचूक उत्तर देऊन एक कोटी रुपये जिंकले होते. आता या गोष्टीला बराच काळ उलटून गेला असून आता हा मुलगा आयपीएस अधिकारी बनला आहे.
२००१ साली ‘केबीसी ज्युनिअर’ या पर्वात एका चिमुरड्याने १ कोटी जिंकण्याचा मान पटकावला होता. आज हा चिमुरडा आयपीएस अधिकारी बनला आहे. १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन रवि सैनीने १ कोटी रुपये जिंकले होते. १४ वर्षांचा रवि सैनी शालेय शिक्षणात देखील खूपच हुशार होता. केबीसी मध्ये येण्याचं त्याचं धैय्य होतं. या शोमध्ये हॉट सीट मिळताच त्याने एकेक प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन अवघ्या १४ व्या वर्षीच करोडपती होण्याचा बहुमान पटकावला. बारावी नंतर जयपूर येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून त्याने एमबीबीएसचं शिक्षण घेतले. तसेच त्याने या क्षेत्रात नोकरी देखील केली. २०१२ साली यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र यात त्याला यश मिळाले नाही. पुढे पुन्हा प्रयत्न करून केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षेत यश मिळवले.
वडील नौदलाच्या सेवेत असल्याने आपणही देशसेवा करण्याच्या हेतूने त्याने आपली एकेक पाऊले पुढे टाकली. २०१४ साली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशात ४६१वा क्रमांक पटकावला आणि आयपीएस बनून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतली.
कौन बनेगा करोडपती या शोचा १४ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय खास पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आहे. या आगामी शोमुळेच आज रवी सैनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर करोडपती बनलेल्या रवि सैनीबद्दल जाणून प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत.