थुकरट वाडीत सज्ज होणार लयभारी जोडी,रितेश आणि जिनेलियाने देणार जुन्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:31 IST2021-11-22T14:30:04+5:302021-11-22T14:31:37+5:30
रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते.

थुकरट वाडीत सज्ज होणार लयभारी जोडी,रितेश आणि जिनेलियाने देणार जुन्या आठवणींना उजाळा
कसे आहात मंडळी मजेत ना? आणि हसताय ना? असा आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे चला हवा येऊ द्या ची. डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आज पर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात.
'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. आठवड्याच्या सुरुवातीला रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.
चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.येत्या आठवड्यात थुकरट वाडीत येणार आहे महाराष्ट्राचं लाडकं सिलेब्रिटी जोडपं रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख. रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते.चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात लयभारी या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती. त्यामुळे रितेश देशमुख हे चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावणारे सगळ्यात पहिले कलाकार आहेत. या कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला.
आता आठ वर्षांनी रितेश या मंचावर 'लयभारी' आणि 'माउली' चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्यांच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे. या दोघांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी कल्ला केला. लय भारी आणि माउली या चित्रपटांवर आधारित एक प्रहसन सादर केलं ज्याने रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसायला भाग पाडलं.