'या' मुस्लिम अभिनेत्याची प्रेमानंद महाराजांना किडनी देण्याची इच्छा, म्हणाला "त्यांनी आणखी १०० वर्ष जगावे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:52 IST2025-10-16T09:51:50+5:302025-10-16T09:52:24+5:30
लोकप्रिय मुस्लिम अभिनेत्यानं प्रेमानंद महाराजांना किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

'या' मुस्लिम अभिनेत्याची प्रेमानंद महाराजांना किडनी देण्याची इच्छा, म्हणाला "त्यांनी आणखी १०० वर्ष जगावे"
Ajaz Khan Offers Kidney To Premanand Ji Maharaj: प्रेमानंद महाराज, राधाराणीचे परम भक्त आहेत, हे वृंदावनचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भजन आणि सत्संगामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक भक्त, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि नेते वृंदावनला येतात. प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या खराब असल्यामुळे, त्यांच्यावर सतत उपचार सुरू असतात. मात्र, काही दिवसांपासून त्यांची तब्येत जास्त बिघडल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्याच्या कारणास्तव महाराजांनी भक्तांना भेटणे कमी केले आहे. त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच आता एका अभिनेत्यानं प्रेमानंद महाराजांना किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेता एजाझ खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात त्यानं जाहीरपणे प्रेमानंद महाराजांना आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. "प्रेमानंद महाराजांचे विचार नेहमीच हृदयाला शांती देतात. त्यांचे शब्द प्रेमाने भरलेले आहेत, त्यांच्या शिकवणीत जीवनाचे सार आहे" असं अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहलं. तर व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "अस्सलामु अलैकुम यारो.... प्रेमानंद महाराज असे व्यक्ती आहेत, ज्यांनी कधीही कोणत्याही धर्माविरुद्ध भाष्य केलेलं नाही, कधीही कोणालाही चिथावणी दिली नाही. मला त्यांना भेटायचे आहे आणि जर माझी किडनी जुळली, तर मी त्यांना माझी एक किडनी देऊ इच्छितो", असं म्हटलं. अभिनेत्यानं पुढे सर्वांना आवाहन केले की, "मित्रांनो, कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ते आणखी १०० वर्षे जगावेत, भारताचे आणि आपल्या सर्वांचे कल्याण करावे". अभिनेत्यानं तो लवकरच महाराजांना भेटायला जाणार असल्याचेही सांगितले.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंही दिली होती ऑफर
प्रेमानंद महाराजांना अनेक भक्तांकडून किडनी दान करण्याची ऑफर आली आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत ती नम्रपणे नाकारली आहे. यापूर्वी, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रानेही त्यांना किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांना पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Polycystic Kidney Disease - PKD) नावाचा आजार झाला आहे. हा किडनीशी संबंधित सर्वात गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. प्रेमानंद महाराजांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना दररोज डायलिसिस करावे लागते. 2006 मध्ये पहिल्यांदा या आजाराचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना झालेला पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (PKD) हा अनुवांशिक (Genetic) विकार आहे. या आजारात किडनीमध्ये पाण्याने भरलेले सिस्ट (गाठ) तयार होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, किडनीचे फिल्टरेशन कमी होते आणि शेवटी किडनी फेल्युअर होण्याचा धोका निर्माण होतो. अशा रुग्णांना पुढे जाऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते.