जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:12 IST2025-08-12T16:11:24+5:302025-08-12T16:12:44+5:30
Tejashree Pradhan:अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने नुकतीच या मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केलंय. आता तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलंय. ती आता 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatali Hi Tutena) या मालिकेत पाहायला मिळत आहे. यापूर्वी तिने छोट्या पडद्यावर 'होणार सून मी ह्या घरची'ची जान्हवी, 'अग्गंबाई सासूबाई'मधील शुभ्रा आणि 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता साकारली होती आणि या भूमिकेतून तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर आता ती वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने नुकतीच या मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील स्वानंदीच्या लूकमधील काही फोटो पोस्ट शेअर केले आहेत. या फोटोत तिने काळा कुर्ता आणि त्यावर लाल रंगाची ओढणी असा साधा लूक केला आहे. यातील तिचा सोज्वळपणा चाहत्यांना भावतो आहे. तेजश्रीने फोटो शेअर करत लिहिले की, 'स्वानंदी... नवं पर्व! गणपती बाप्पा मोरया'. #HappyLife असा हॅशटॅगही तिने या पोस्टमध्ये वापरला आहे.
तेजश्री प्रधानच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ''खूप प्रेम ताई. तू निभावलेलं प्रत्येक पात्र नेहमी एक नवी उमेद घेऊन येतं आणि बळ देऊन जातं.'' दुसऱ्या युजरने म्हटले की, ''इतक्या वर्षांनीदेखील तू तशीच कशी दिसू शकते?''