"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:29 IST2025-09-02T17:09:18+5:302025-09-02T17:29:22+5:30

"कुठून आणलीस गं ही ताकद?", प्रिया मराठेच्या निधनानंतर आस्ताद काळेचं भावुक पत्र, म्हणाला...

actress priya marathe passes away at the age of 38 aastad kale wrote emotional post will bring tears to eyes after reading it | "कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील

"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील

Priya Marathe Passes Away: मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रतिभावान अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झालं.'पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतील मराठमोळ्या कुटुंबातील वर्षाची भूमिका असो किंवा ‘चार दिवस सासूचे’,‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ ' या सुखांनो 'अशा मराठी मालिकांमधील भूमिका असोत, प्रिया मराठेने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या दमदार आणि मनाला भिडणाऱ्या अभिनयाने जिवंत केली.कर्करोगाशी धैर्याने लढताना तिने अखेरपर्यंत जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले. या गुणी  अभिनेत्रीच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 

प्रिया मराठे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. प्रियाच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीत कलाकारांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यात आता प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेता आस्ताद काळेने भावुक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्याने म्हटलंय, "शंतनू...मित्रा.... तुझ्याविषयी आपलेपणा, आपुलकी ही कायमच वाटत आली आहे. आता फार फार आदरही वाटतो आहे. वाटत राहील. तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याची मनापासून माफी मागतो रे....पण हे पत्र मी लिहीतोय ते मात्र प्रियाला. जमेल तेव्हा please  तिच्यापर्यंत पोचवशील?"

प्रिया मराठेबद्दल शेअर केली पोस्ट...

यापुढे अभिनेत्याने लिहिलंय," प्रिय प्रिया,तू शूर आहेस. आजही आहेस. कायमच असशील.आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही. पण चांगले संबंध, परस्परांविषयी आदर,आत्मीयता, आणि एकमेकांची यथेच्छ मस्करी आणि अपमान करायचे एकमेकांना दिलेले अधिकार हे सगळं आहे नक्की. पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्रपरिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं.
तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाहीत, त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे. खात्रीलायक लोकांकडून. त्या कष्टांची प्रसिद्धीरूपी आणि आर्थिक फळं उत्तमरित्या मिळूनही तुझा तसूभरही न बदललेला स्वभाव मात्र मीही पाहिला आहे. अवघड असतं गं हे जमणं. भल्याभल्यांना जमत नाही.आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करून मुंबईसारख्या शहरात स्वत:च्या मालकीचं मोठं घर घेणं, ते सजवणं, संसार उभा करणं, हे फार फार अभिमानास्पद आहे. पण हे झालं भौतिक यश."

"तूही काही काळ खचली असशील, घाबरली असशील. पण..."

"माणूस म्हणून तू जे जे केलं आहेस, त्याला तोड नाही.मस्तीखोर,मनमिळावू,संवेदनशील, थोडीशी ढिश्क्यांव, असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर बघितले. तुला चिडलेलं पाहिल्याचं मात्र आठवत नाही. वैतागलेली आठवत्येस, पण चिडून कोणाशी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही. कधी तसं कानावरही आलं नाही. थोडक्यात सांगायचं तर साधारण २० वर्षं तू या क्षेत्रात काम केलंस, पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही. वेडंवाकडं कधीच नाही. हे असं वागता येणं खूप अवघड असतं गं. भल्याभल्यांना जमत नाही.आपल्याला हा नीच आजार जडलाय हे पहिल्यांदा समजल्यावर तूही काही काळ खचली असशील, घाबरली असशील. पण मला दिसली ती कंबर कसून त्या हलकटाशी लढायला उभी राहिलेली तू.एकदा मागे रेटलंस त्याला. पण तो परत आला. येतोच तो. पुन्हा लढाई. पुन्हा यातना. जरी आप्तेष्ट जवळ असले, शंतनूसारखा धीराचा, आदर्श जोडीदार सोबत असला, तरी सर्व काही भोगत असलेलं शरीर तुझंच. मानसिक यातना वाटून घेतल्याच असणार सर्वांनी, पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच. आणि संपूर्ण एक वर्षं!!!! कुठून आणलीस गं ही ताकद????!!!!! की होतीच तुझ्यात? पण ती दिसण्यासाठी हे कारण उद्भवायची गरज नव्हती ना राव!!!!! तुझ्या अभिनयाबद्दल मी काही बोलणार नाही. त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरून दिल्या आहेत.माणूस, मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया. खूप शिकवलंस. ताकद दाखवलीस. हसवलंस......तेवढंच लक्षात ठेवायचंय.....हसवलंस.....",अशा भावना अभिनेत्याने या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

Web Title: actress priya marathe passes away at the age of 38 aastad kale wrote emotional post will bring tears to eyes after reading it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.