'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:55 IST2025-08-13T15:55:12+5:302025-08-13T15:55:59+5:30
आपल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये अभिजीत सावंतने पहिल्यांदाच एक काम केलं आहे.

'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
इंडियन आयडॉलच्या पहिल्याच सीझनचा विजेता गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). इंडियन आयडॉल' या लोकप्रिय शोच्या पहिल्याच सीझनचा विजेता हा मराठमोळा होता. गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) हा किताब पटकावला होता. अभिजीत पहिला 'इंडियन आयडॉल' ठरला आणि रातोरात स्टार झाला. नंतर त्याने अनेक लोकप्रिय गाणी गायली. मात्र हळूहळू तो प्रसिद्धीझोतापासून दूर गेला. काही वादांमध्येही अडकला. त्याची लोकप्रियता कमी झाली. गेल्या वर्षी बिग बॉस मराठी ५ मुळे तो पुन्हा लाईमलाईटमध्ये आला. आपल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये अभिजीत सावंतने पहिल्यांदाच एक काम केलं आहे.
गायक अभिजीत सावंतची अनेक गाणी गाजली आहेत. 'मोहोब्बते लुटाऊंगा', 'सर सुखाची' ही त्याची गाजलेली गाणी. पण इतक्या वर्षात अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मराठी मालिकेचं शीर्षक गीत गायची संधी मिळाली आहे. झी मराठीवर नव्याने सुरु झालेली मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' चं शीर्षक गीत अभिजीत सावंत आणि सावनी रविंद्रने गायलं आहे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानची ही मालिका आहे. सावनी आणि अभिजीत गाणं रेकॉर्ड करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहिल्यांदाच मालिकेचं शीर्षक गीत गायल्यानंतर अभिजीतने त्याचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणतो, "झी मराठीसारख्या वाहिनीवर मालिकेचं शीर्षक गीत गायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्यात इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण केल्यानंतर ही संधी मिळाली याचा जास्त आनंद होत आहे. गाणं रिलीज होऊन काहीच दिवस झाले आहेत आणि प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. सुंदर शब्दांतून तयार झालेल्या या गोड गाण्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून समाधान वाटत आहे. माझ्यासाठी हा कधीही न विसरता येणारा अनुभव आहे."