"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:15 IST2025-07-13T13:15:20+5:302025-07-13T13:15:39+5:30
राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठी-हिंदीच्या राजकारणावर बिचुकलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पण, त्यासोबतच बिचुकलेंनी स्वत:ला शिवरायांच्या गादीचा वारस असल्याचं म्हटलं आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत बिचुकले कायमच त्यांच्या अजब गजब वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. समाजात घडणाऱ्या घडामोडींवर बिचुकले त्यांचं मत अगदी बिनधास्त आणि ठामपणे व्यक्त करताना दिसतात. त्यांचा आत्मविश्वास हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. ते राजकारणातही सक्रिय असतात. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठी-हिंदीच्या राजकारणावर बिचुकलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पण, त्यासोबतच बिचुकलेंनी स्वत:ला शिवरायांच्या गादीचा वारस असल्याचं म्हटलं आहे.
बिचुकलेंनी मराठी-हिंदी वादावर टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजकारणावर भाष्य केलं. भाजपाने त्यांची सत्ता असलेल्या राज्यात मराठी भाषा सक्तीची करावी, असं ते म्हणाले. मात्र शिवाजी महाराजांच्या वारसा गादीबद्दल बोलताना ते बरळले आहेत. नेमकं काय म्हणाले आहेत बिचुकले जाणून घेऊया.
अभिजीत बिचुकले म्हणतात "मीच शिवरायांचा वारस"
"महाराष्ट्राला आता उद्याचा नेता म्हणून फक्त अभिजीत बिचुकले आहे. सगळ्यांची वय, कट कारस्थाने आणि कारनामे पाहा... हे दारू आणि मटणावर अनेकांच्या निवडणुका झाल्या. पूर्वी काँग्रेस होतं, आता भाजप आहे उद्या डॉक्टर अभिजीत बिचुकलेच असेल. त्यामुळे माझ्याबरोबर तुम्हा सगळ्यांना यायचंय. मी कोणासोबत जात नाही. शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून राजगादीसोबत तुम्हाला सगळ्यांना यायचंय. आजपर्यंत तुम्ही राजगादीचा आणि छत्रपतींचा गैरवापर केला. आता त्यांचा खरा वंशज आलाय डॉ. अभिजीत बिचुकले. उदयनराजे हे शांत आणि सभ्य असतील. पण, मी त्यांच्यापेक्षा सभ्य आहे. पण, छत्रपतींच्या नावाचा गैरवापर इथून पुढे मी कोणालाही करून देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझी आहे".