क्रिकेटसंबंधी २५ लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने लाईफलाईन वापरली तरीही उत्तर देता आलं नाही, तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:31 IST2025-08-22T11:30:25+5:302025-08-22T11:31:53+5:30
‘कौन बनेगा करोडपती १७’मधील स्पर्धकाला क्रिकेटविषयीच्या २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तुम्हाला माहितीये का?

क्रिकेटसंबंधी २५ लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने लाईफलाईन वापरली तरीही उत्तर देता आलं नाही, तुम्हाला माहितीये?
‘कौन बनेगा करोडपती १७’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये पहिल्या सातच दिवसांमध्ये करोडपती स्पर्धक मिळाला. आता ‘कौन बनेगा करोडपती १७’ची पुढील वाटचाल सुरु आहे. नवनवीन स्पर्धक हॉटसीटवर बसून अवघड प्रश्नांची उत्तरं देऊन विजयी रक्कम जिंकत आहेत. अशातच ‘कौन बनेगा करोडपती १७’ एका स्पर्धकाला क्रिकेटसंबंधी असलेल्या २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तुम्हाला माहितीये का उत्तर?
काय होता २५ लाखांचा प्रश्न
‘कौन बनेगा करोडपती १७’ शोमध्ये साकेत नंदकुमार सोनार नावाचा स्पर्धक २५ लाख रुपयांच्या एका प्रश्नावर अडकला. हा प्रश्न क्रिकेटशी संबंधित होता, त्यामुळे साकेतसाठी तो प्रश्न अधिकच कठीण ठरला. हा प्रश्न होता की, “१९३२ मध्ये आपल्या टेस्टमध्ये पदार्पण करताना इफ्तिखार अली खान पटौदी यांनी इंग्लंडसाठी कोणत्या मैदानावर शतक बनवले होते?” साकेत या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही आणि त्याला खात्री नव्हती, त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. शोमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याने 'द ओव्हल' हे उत्तर दिले, पण ते चुकीचे ठरले. या प्रश्नाचे अचूक उत्तर ‘सिडनी क्रिकेट ग्राउंड’ होते.
साकेतने शो सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याने १२,५०,००० रुपये जिंकले. साकेत नंदकुमार सोनारने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चांगली कामगिरी केली, पण क्रिकेटच्या एका प्रश्नामुळे त्याला २५ लाख रुपयांची विजयी रक्कम गमवावी लागली. अमिताभ यांनी साकेतच्या खेळाचं कौतुक केलं. साकेतला २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून त्यांना वाईटही वाटलं. परंतु साकेतच्या बुद्धीचं आणि हुशारीचं त्यांनी कौतुक केलं.