वर्षभरानंतर आईवडिलांना भेटणार हा अभिनेता, सोशल मीडियावर झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:26 IST2021-06-03T16:25:28+5:302021-06-03T16:26:17+5:30
कबीर खान दिग्दर्शित रणवीर सिंगच्या '83' या सिनेमातही ताहीर भसीन दिसेल. यात तो भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांची भूमिका साकारणार आहे.

वर्षभरानंतर आईवडिलांना भेटणार हा अभिनेता, सोशल मीडियावर झाला भावूक
लोकप्रिय बॉलिवुड अभिनेता ताहीर राज भसिन अखेर वर्षभरानंतर आईवडिलांना भेटणार आहे. त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाण्यास आता तो अगदी उतावीळ झालाय. ताहीरच्या तीन सिनेमांची घोषणा झाली. त्यामुळे जागतिक महासंकटाच्या काळात़ही तो संपूर्ण वेळ कामच करत होता. तो लूप लपेटामध्ये तापसी पन्नूसोबत, बुलबुल तरंगमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत आणि ये काली काली आंखेंमध्ये श्वेता त्रिपाठीसोबत दिसणार आहे. तो सेटवर असायचा. त्यामुळे आईवडिलांना उगीच धोका निर्माण व्हायला नको म्हणून तो आई वडिलांना भेटला नाही.
"मागचं वर्ष फार कठीण होतं. मुंबईत सिनेमाच्या सेटवर मी काम करत होतो. त्यामुळे घरी जाण्यासाठी प्रवासावर बंधनं आली. कुटुंबाला, मित्रपरिवाराला आपल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सतत होती. या आठवड्यात मी दिल्लीला, घरी जातोय. वर्षभरानंतर आता आईवडिलांना भेटणार. ही भेट फार भावनिक असेल. मी फार उत्सुक आहे," असं ताहीर म्हणाला.ताहीरच्या आईवडिलांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्यानेही काही दिवसांपूर्वी मनालीत लस घेतली. त्यामुळे आता विषाणूची लागण होण्याचा धोका काहीसा कमी झाल्याने तो आईवडिलांना भेटण्यासाठी आता अधिक वाट पाहू शकत नाही.
तो म्हणतो, "आता फारच काळ लोटलाय. आता मला रिकामा वेळ, गप्पाटप्पा, घरचं जेवण हवंय. मागील काही महिने आपण जसे जगत आलोय त्यानंतर तर मला या सगळ्यांचं मोल अधिकच कळलंय. मला या सगळ्याची अधिक आठवण येते, मी त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची अधिक चिंता करतो, पूर्वीपेक्षा जरा जास्तच. मी फोन बंद करून फक्त त्यांच्यासोबत असणार आहे. कुटुंब म्हणून आम्ही सगळं काही शेअर करतो, एकमेकांना अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही सांगतो. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच गप्पा असणार आहेत."
कबीर खान दिग्दर्शित रणवीर सिंगच्या '83' या सिनेमातही ताहीर दिसेल. यात तो भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्याकडे आता चार चांगले सिनेमे आहेत त्यामुळे तो चमकता तारा ठरणार आहे. पण त्याआधी ताहीरला पूर्वीसारखा कुटुंबासोबतचा वेळ घालवायचा आहे.