सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:56 IST2025-11-17T11:55:53+5:302025-11-17T11:56:47+5:30
सुश्मिता सेनने डॉक्टरांना तिला बेशुद्ध न करण्यास सांगितलं, शुद्धीत राहूनच तिने सर्जरीच्या वेदना सहन केल्या; कारण...

सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
अभिनेत्री सुश्मिता सेनचा मोठा चाहतावर्ग आहे. ४९ वर्षीय सुश्मिता आजही तितकीच फिट, सुंदर आहे. तिच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे अनेक जण चाहते आहेत. २०२३ साली सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. एवढी फिट असूनही हार्टॲटॅक आल्याने तिलाही यावर विश्वास बसत नव्हता. सुश्मिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची अँजिओप्लास्टी झाली. सुश्मिताने पूर्ण शुद्धीत राहून सर्जरी करुन घेतली होती असा धक्कादायक खुलासा तिने नुकताच केला.
दिव्या जैनला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेन म्हणाली,"माझ्या डॉक्टरांशी बोललात तर ते तुम्हाला हेच सांगतील की माझ्यात किती धैर्य होतं. अँजिओप्लास्टी करताना मला बेशुद्ध व्हायचं नव्हतं. माझ्यातला कंट्रोल फ्रीक स्वभाव मला बेशुद्ध राहू देत नाही. म्हणूनच हृदयविकाराचा धक्का आला तरी मी वाचले. कारण ते सहन करुन शुद्धीत राहणं, बेशुद्ध होऊन झोपणं आणि मग परत जागं न होणं या यापैकी मला एक पर्याय निवडायचा होता. म्हणूनच मी शुद्धीत राहण्याचा निर्णय घेतला."
ती पुढे म्हणाली, "संपूर्ण अँजिओप्लास्टी करताना मी शुद्धीत होते. वेदना कमी न होण्याबाबतीतही मला अंदाज होता. नक्की काय घडतंय हे मला पाहायचं होतं. त्या प्रसंगातून जाताना मी डॉक्टरांशी बोलत होते. मी त्यांना लवकर करा असं म्हणत होते कारण मला सेटवर जायचं होतं. माझी टीम जयपूरमध्ये माझी वाट पाहत होती."
"जेव्हा तुम्ही एखाद्या शोमध्ये मुख्य भूमिकेत असता तेव्हा हे काही साधारण काम नसतं. तुम्हाला ५०० लोकांची जबाबदारी घेण्याचं सौभाग्य मिळतं. ते सगळेच तुमच्यासोबत चांगले असतात. त्यांना आपली काळजी असते. पण सोबत मलाही त्यांच्या रोजगाराची चिंता असते कारण आपल्यामुळे शूटिंग थांबलेलं असतं. मी ठीक होते मला जे करायचं ते मी केलं होतं त्यामुळे मला पुढे जाणंच होतं. डॉक्टर माझ्यावर ओरडत होते तरी मला त्यांच्याशी बोलायला १५ दिवस लागले. मग शेवटी मला जाऊन 'आर्या'सीरिजचं शूट पूर्ण करता आलं.", असंही ती म्हणाली.