'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 10:23 IST2025-08-16T10:21:26+5:302025-08-16T10:23:51+5:30
'रामायण'चं काहीच दिवसात शूट सुरु करणार सनी देओल

'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तब्बल ४ हजार कोटींचं सिनेमाचं बजेट आहे. सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश मुख्य भूमिकेत आहेत. सनी देओल (Sunny Deol) लवकरच 'रामायण'चं शूट सुरु करणार आहे. यामध्ये तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच त्याने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
टाइम्स नाऊशी बोलताना सनी देओल म्हणाला, "मला वाटतं हा सिनेमा खूप चांगला होणार आहे. रणबीर एक खूप चांगला कलाकार आहे. तो कोणताही प्रोजेक्ट हातात घेतो तेव्हा ती भूमिका अक्षरश: जगतो. सिनेमातील भूमिकेवरुन दबावाबद्दल सांगायचं तर थोडं नर्व्हस तर वाटतंच. पण हीच याची सुंदरता आहे. तुम्ही या आव्हानाचा सामना कसा कराल हा विचार करायला लागता. तसंच या भूमिकेमध्ये कसे खरे उतराल याची विचार येतो. आमचे दिग्दर्शक, निर्मात्यांनी यावर खूप अभ्यास केला आहे. ते जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते हॉलिवूडपेक्षा कमी नसणार याची मला खात्री आहे."
"रामायण असं किती वेळा बनलं आहे आणि किती रामलीला होतात? जेव्हा गोष्टी मोठ्या पडद्यावर येतात तेव्हा सर्वच कलाकार ज्या पद्धतीने परफॉर्म करत आहेत मला खात्री आहे ही प्रत्येक जण आपल्या भूमिकेला न्याय देईल. लोक संतुष्ट होतील आणि संपूर्ण सिनेमाचा आनंद घेतील."
'रामायण'चा पहिला भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर येणार आहे. तर दुसरा भाग २०२७ मध्ये येणार आहे. नमित मल्होत्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचं हाय बजेट, आंतरराष्ट्रीय व्हीएफएक्स, अॅक्शन आणि म्युझिक टीम यामुळे सिनेमा भव्यदिव्य होणार यात शंका नाही.