ताटवा चित्रपटाचा शानदार सोहळा

By Admin | Updated: April 20, 2017 23:44 IST2017-04-20T23:44:19+5:302017-04-20T23:44:19+5:30

उत्तम निर्मितीमूल्य, कथामांडणी, दमदार दिग्दर्शन आणि गीत-संगीताच्या मधुर सुरावटी यांच्या एकत्रीकरणातून निर्मिलेला शरयू आर्ट प्रोडक्शननिर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी

A splendid celebration of Tatao movie | ताटवा चित्रपटाचा शानदार सोहळा

ताटवा चित्रपटाचा शानदार सोहळा

उत्तम निर्मितीमूल्य, कथामांडणी, दमदार दिग्दर्शन आणि गीत-संगीताच्या मधुर सुरावटी यांच्या एकत्रीकरणातून निर्मिलेला शरयू आर्ट प्रोडक्शननिर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी सिनेमाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते झाला. डॉ. शरयु पाझारे निर्मित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित ‘ताटवा’ 26 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुंदर कथेच्या कॅनव्हासवर ‘ताटवा’ सिनेमातील गीतांनी सुरेख रंग भरले असल्याची भावना व्यक्त करताना ‘ताटवा’ सिनेमाला गायिका अनुराधा पौडवाल यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने नावीन्याचा ध्यास घेत स्वत:ला घडवायला हवे असे सांगताना ‘ताटवा’ या सिनेमातून हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची भावना निर्मात्या डॉ. शरयू पाझारे यांनी या वेळी व्यक्त केली. ‘ताटवा’ या चित्रपटात तीन गाण्यांचा नजराणा आहे. गीतकार श्रीपाद भोले यांच्या शब्दांनी यातील गीते सजली असून, संगीतकार अतुल जोशी आणि प्रशांत फासगे यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. सावनी रवींद्र, अतुल जोशी, केवळ वाळंज, प्रसाद शुक्ल, योगीता गोडबोले-पाठक यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. समाजातील विषमतेवर ‘ताटवा’ या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

अरुण नलावडे दिग्दर्शित या चित्रपटात संजय शेजवळ आणि गौरी कोंगे या जोडीसोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरजे, विक्रांत बोरकर, शीतल राऊत, नूतन धवणे, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजूषा जोशी आणि बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत. ‘ताटवा’ चित्रपटाचे चित्रीकरण चंद्रपूर येथे झाले आहे. चित्रपटाची कथा एम. कंठाळे यांनी लिहिली असून, संवाद डॉ. शरयु पाझारे, डॉ. सरिता घरडे, सुरेश कांबळे, शैलेश ठावरे यांनी लिहिलेत. सदानंद बोरकर यांनी कलादिग्दर्शन, तर ज्येष्ठ छायाचित्रकार इम्तियाज बारगीर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. संकलन बी. महन्तेश्वर आणि रोहन सरोदे यांचे आहे. कार्यकारी निर्माते विवेक कांबळे आहेत.

Web Title: A splendid celebration of Tatao movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.