अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 06:10 PM2024-05-25T18:10:53+5:302024-05-25T18:11:16+5:30

आदेश भाऊजी आणि पारू मालिकेच्या टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले.

special episode of 'Home Minister' with Paru and Aditya in Akkalkot | अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग

अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग

झी मराठी एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. हे  नवीन रूप उलगडणार आहे २७ मे २०२४च्या सायंकाळी. आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करतो म्हणूनच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर अक्कलकोटला 'श्री स्वामी समर्थ मंदिरात' पोहचले. स्वामींच्या मंदिरात ३०,००० सोनचाफ्याच्या फुलांची आरास केली गेली होती. आदेश भाऊजी आणि पारू मालिकेच्या टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले.   

आदेश बांदेकर म्हणाले, खरंतर अक्कलकोट पुण्यभूमी आहे. माझ्या घरात स्वामी भक्ती २४ तास सुरूच असते मग त्यात पारायण असो किंवा सुचीत्राची पारायणासोबत नित्य पूजा हे ठरलेलं आहे. त्यातून अक्कलकोटला जेव्हा जेव्हा जातो त्यावेळी अशक्य ही शक्य करतील स्वामी याची नेहेमी प्रचिती येते, त्या वातावरणात ते चैतन्य अनुभवत असताना बहरणाऱ्या नात्यांच्या २० वर्षाच्या  प्रवासामध्ये  होम मिनिस्टरच्या माध्यमातून  मी अनेक वर्ष अक्कलकोटला जात आहे. पण ह्यावेळी एक वेगळाच अनुभव आहे कारण स्वामींच्या मंदिरात त्यांना आवडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांची आरास झी मराठीने केली यासाठी ३०,००० सोनचाफ्याची फुलं वापरण्यात आली.  ती आरास अनुभवत असताना एक वेगळंच चैतन्य होते. मी जेव्हा स्वामींची आरती करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू कधी आले मला कळलेच नाही.  भारावून टाकणारं वातावरण होत ते, मी शब्दात हा अनुभव पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाही. त्यानंतर अन्नछत्रमध्ये  गेलो तिथे भाविकांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि  पुन्हा आपण लोकांच्या घरात वारी करू ती नाती घट्ट करू, बहरू आणि सुगंध नात्याचा असाच दरवळत राहूदे अश्या भावना उराशी बांधून मी तिथून बाहेर पडलो."

भाऊजींसोबत यावेळी 'पारू' मालिकेतील पारू आणि आदित्य देखील उपस्थित होते. 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणेने म्हणाले," मी झी मराठीचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे मला अक्कलकोटला जायची संधी मिळाली आणि स्वामींच्या पादुकांना स्पर्श करायला मिळाले. चाफ्याच्या फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट पाहून डोळे दिपून गेले होते.  ह्यासोबतच  'होम मिनिस्टर' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी  स्वतःला खूप भाग्यवान समजते मला स्वामींचे इतके सुंदर दर्शन या निमित्ताने करता आले, ते ही इतक्या महत्वाच्या दिवशी."

यानंतर याच स्वामींच्या पुण्यभूमीत पारू आणि आदित्यसोबत पार पडला 'होम मिनिस्टरचा' खेळ. या विशेष भागात अनेक किस्से आणि धम्माल मज्जा मस्ती झाली.  स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधून होम मिनिस्टरचा ‘पारू’ विशेष भाग २७ मे संध्या. ६.३० वा. फक्त झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: special episode of 'Home Minister' with Paru and Aditya in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.