मल्याळम सिनेमा 'मंजुमल बॉईज' एवढा का गाजतोय? सत्य घटनेवर आधारित ९ मित्रांची थरारक कहाणी वाचाच

By देवेंद्र जाधव | Published: March 22, 2024 04:09 PM2024-03-22T16:09:28+5:302024-03-22T16:11:58+5:30

मल्याळम इंडस्ट्रीतील 'मंजुमल बॉईज' सिनेमा सध्या का गाजतोय? तुम्ही पाहायचा विचार करत असाल तर हा लेख वाचाच

Why 'Manjummel Boys' so popular in Malayalam industry? know real story of manjummel boys | मल्याळम सिनेमा 'मंजुमल बॉईज' एवढा का गाजतोय? सत्य घटनेवर आधारित ९ मित्रांची थरारक कहाणी वाचाच

मल्याळम सिनेमा 'मंजुमल बॉईज' एवढा का गाजतोय? सत्य घटनेवर आधारित ९ मित्रांची थरारक कहाणी वाचाच

वाचकांनो! नवनवीन आणि दर्जेदार कलाकृतीचा आनंद घेणं हे प्रत्येक दर्दी रसिकांचं काम. काही अज्ञात आणि तरीही चांगल्या सिनेमांबद्दल तुम्हाला सांगणं हे आमचं काम. असाच एक कदाचित तुम्हाला माहित नसलेल्या सिनेमाबद्दल आम्ही सांगणार आहोत. तो म्हणजे 'मंजुमल बॉईज'. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने सिनेमाचं कौतुक करुन 'बॉलिवूड अजून खुप मागे आहे', असं मोठं विधान केलं. सध्या हा सिनेमा मल्याळम इंडस्ट्रीतच नव्हे तर भारतभर प्रचंड गाजतोय. काय आहे यामागचं कारण?

'मंजुमल बॉईज' सिनेमा पाहून जेव्हा आपण उठतो तेव्हा तो २ तास १० मिनिटांचा थरारक सिनेअनुभव आपला पिच्छा सोडत नाही. एवढं काय आहे या सिनेमात. 'मंजुमल बॉईज' हा सत्य घटनेवर आधारीत सिनेमा आहे. जास्त तपशिलात न शिरता कथा सांगायची झाली तर, ८ - ९ मित्रांचा एक ग्रुप पिकनीक काढायचं ठरवतात. पिकनीकला कुठे फिरायचं हे ठरलेलं असतं. सर्व काही सुरळीत चालू असतं पण त्यांनी घेतलेला एक निर्णय सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. 

पिकनीकमध्ये मित्रांपैकी एक जण म्हणतो की, कमल हासनने ज्या लेणीत शुटींग केलं ते ठिकाण बघू. सगळे उत्साहात असल्याने शुटींगचा तो स्पॉट बघायचं ठरवतात. पुढे जायला बंदी असूनही सगळे बॅरीकेड ओलांडून त्या लेणीवजा गुहेत खाली खाली उतरत जातात. ते निसर्गरम्य दृश्य बघून सगळ्यांनाच आनंद मिळतो. भान हरपून सगळे जल्लोष करत असतात. तोच त्यांच्यातला एक मित्र अचानक जमिनीच्या उदरात गडप होतो. 

याचा अर्थ असा की.. त्या गुहेत एक मोठा खड्डा असतो. तो मित्र थेट त्या खड्ड्यात पडून खाली जातो. त्याचा खाली जाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की, उंच दरीवरुन आपण दगड खाली फेकावा अन् तो घरंगळत जावा तसा तो आणखी खाली जातो. त्याच्या मित्रांना वाटतं की, तो मस्करी करतो. त्यामुळे सगळे त्या खड्ड्याच्या वरुन त्याला हाका मारतात. पण खाली गेलेला तो बेशुद्ध असतो. आणि मग त्याला सुखरुप परत आणण्यासाठी त्याचे इतर मित्र काय करतात, याची थरारक कहाणी म्हणजे 'मंजुमल बॉईज'.

'मंजुमल बॉईज' हा मल्याळम इंडस्ट्रीतला पहिला सिनेमा आहे ज्याने २०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केलाय. 'मंजुमल बॉईज'चा सिनेमॅटिक अनुभव थक्क करणारा आहे. इतक्या थरारक सिनेमाचं शुटींग कसं केलं असेल? हा मोठा प्रश्न आणि कुतुहल मनात असतं. सिनेमा पाहताना शेवटी आपलेही श्वास रोखले असतात. पुढे काय होईल याचा अंदाज नसतो. विशेष म्हणजे ही घटना घडल्यावर पुढच्या आयुष्यात त्या मित्रांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याचंही चित्रण दिसतं. आणि एकाक्षणी सुन्न व्हायला होतं.

कलाकार तर अभिनय करत आहेत असं वाटतच नाहीत इतका सहज वावर प्रत्येकाचा सिनेमात आहे. तांत्रिकदृष्ट्याही 'मंजुमल बॉईज' अव्वल झालाय. त्यामुळे ओटीटीवर येण्याची वाट पाहू नका, अजुनही थिएटरमध्ये सुरु असेल तुमच्या आसपास. नक्की बघा. आणि मोठी माणसं सांगत असतात की, "बाहेर गेल्यावर दंगा-मस्ती करु नका, आगाऊपणा करु नका, सुखरुप या". त्यामुळे त्यांचंही जरा ऐकत जा.

 

Web Title: Why 'Manjummel Boys' so popular in Malayalam industry? know real story of manjummel boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood