'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:36 IST2025-05-04T12:31:53+5:302025-05-04T12:36:20+5:30
'रेट्रो'च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमातील वक्तव्यावरुन निर्माण झाला नवा वाद.

'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता?
Vijay Deverakonda Controversy: तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा सध्या चर्चेत आला आहे. नुकतेच हैदराबादमध्ये झालेल्या 'रेट्रो' या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिनेता वादात अडकला. या कार्यक्रमात विजय देवरकोंडानं काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली होती. तसेच त्यानं पाकिस्तानावर टीका करताना आदिवासी समाजाचा उल्लेख केला होता. पण, अनेकांनी विजयचं ते विधान आदिवासी समाजाचा अपमान करणार होतं, असं म्हटलं आहे. यावरुन त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी आता विजयनं स्पष्टीकरण देत माफी (Tribe Remark Apology) मागितली आहे.
विजयने आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. इतकंच नव्हे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात औपचारिक तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या वकील लाल चौहान यांनी SR नगर पोलीस ठाण्यात ही FIR दाखल केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.या तक्रारीनंतर अखेर विजयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याची बाजू मांडली आहे.
विजयनं लिहलं, "'रेट्रो'च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात मी केलेल्या एका वक्तव्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, याची मला जाणीव झाली आहे. माझा उद्देश कोणत्याही समुदायाला – विशेषतः अनुसूचित जमातींना – दुखावण्याचा नव्हता. मी सर्व समुदायांचा मनापासून सन्मान करतो. भारत एक आहे, आपले लोक एक आहेत आणि आपण सर्वांनी मिळून पुढे जायला हवं, असं म्हणतो. सगळे भारतीय माझ्यासाठी एक कुटुंब आहेत. मी भारतीय समाजातील कोणत्याही गटाविरुद्ध भेदभावाची कल्पनाही करू शकत नाही. कोणत्याही समाजाविरुद्ध काही बोलण्याचा माझा हेतू नव्हता".
आपल्या शब्दांच्या निवडीबाबत स्पष्टीकरण देत विजयनं पुढे लिहलं, " ऐतिहासिक आणि शब्दकोशाच्या अर्थाने मी जमाती हा शब्द वापरला होता. मी अशा काळाचा संदर्भ देत होतो, जेव्हा जगभरातील मानवी समाज 'जनजाती' आणि 'कुळां'मध्ये विभागलेला होता हा शब्द भारतातील अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाशी संबंधित नव्हता. अनुसूचित जमातीचं वर्गीकरण हे औपनिवेशिक आणि स्वातंत्र्योत्तर भारतात अस्तित्वात आलं आणि ज्याचं औपचारिक रूप केवळ गेल्या शतकात ठरवण्यात आलं आहे. मी वापरेला शब्द हा भारतातील अनुसूचित जमातींशी संबंधित नव्हता. इंग्रजी शब्दकोशानुसार 'tribe' म्हणजे: "परंपरागत समाजातील अशी सामाजिक विभागणी, जिथे कुटुंबं किंवा समुदाय हे सामाजिक, आर्थिक, धार्मिक किंवा रक्तसंबंधांद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यांचं एक समान सांस्कृतिक व भाषिक जीवन असतं".
या पोस्टच्या अखेरीस विजयने माफी मागितली. त्याने लिहिलं, "जर माझ्या भाषणाचा कोणताही भाग चुकीचा समजला गेला असेल किंवा कोणाला दुखावलं असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. शांतता, प्रगती आणि एकतेचा संदेश देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी माझ्या व्यासपीठाचा वापर प्रगती आणि एकतेसाठी करण्यास वचनबद्ध आहे, त्यात फूट पाडण्यासाठी नाही", असं त्याने पोस्टच्या शेवटी म्हटलं.
To my dear brothers ❤️ pic.twitter.com/QBGQGOjJBL
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) May 3, 2025
नेमकं काय म्हणाला होता विजय?
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना विजय म्हणाला होता, "काश्मीरमध्ये जे घडतंय त्यावर उपाय म्हणजे दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणं आणि त्यांचं ब्रेनवॉश होऊ नये याची खात्री करणं. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर भारताचं आहे आणि काश्मिरी देखील भारताचे आहेत. त्याबद्दल कोणताही वाद नसावा. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही. कारण पाकिस्तान स्वतःचा देश सांभाळू शकत नाहीत. त्यांच्याकडे वीज आणि पाणी सारख्या आवश्यक गोष्टी नाहीत आणि ते आपल्याशी काय युद्ध लढतील? काही दिवसांनी तिथलेच लोक पाकिस्तानविरुद्ध बंड करतील. खरं तर, ज्याप्रमाणे ५०० वर्षांपूर्वी आदिवासी लढत असत, त्याचप्रमाणे हे लोक बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानाशिवाय काम करत आहेत".