'KGF' च्या 'चाचा'चं निधन, 'या' गंभीर आजाराने घेतला जीव; पोट फुगले, हात-पाय झाले होते बारीक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:38 IST2025-11-06T13:37:50+5:302025-11-06T13:38:50+5:30
'केजीएफ' अभिनेते हरीश राय यांचे निधन! मृत्यूचं कारण ठरला 'हा' दुर्धर कॅन्सर

'KGF' च्या 'चाचा'चं निधन, 'या' गंभीर आजाराने घेतला जीव; पोट फुगले, हात-पाय झाले होते बारीक!
Harish Rai Aka Kgf's 'chacha' Dies: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'केजीएफ' चित्रपटात चाचाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते हरीश राय यांचे निधन झाले आहे. अनेक वर्षांपासून ते थायरॉईड कर्करोगशी झुंज देत होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
हरीश राय यांचा आजार हळूहळू वाढत गेला आणि कर्करोग त्यांच्या पोटापर्यंत पसरला. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते अंथरुणावर खिळून होते. त्यांच्या पोटात द्रव साचल्याने सूज आली होती. काही काळापूर्वी इन्फ्लुएंसर गोपी गौडूनं त्यांची भेट घेतली आणि एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये हरीश राय यांनी त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीसाठी उघडपणे आवाहन केले होते. आर्थिक मदतीची मागणी करताना त्यांनी उपचाराचा खर्च उघड केला होता. त्यांनी सांगितले होते की, एका इंजेक्शनसाठी त्यांना ३.५५ लाख खर्च येतो आणि डॉक्टरांनी ६३ दिवसांत तीन इंजेक्शन्सची शिफारस केली आहे, ज्याची किंमत अंदाजे १०.५ लाख आहे.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, 'केजीएफ' स्टार यश त्यांची मदत करत आहेत का, तेव्हा ते म्हणाले, "यशने यापूर्वीही माझी मदत केली आहे, पण मी प्रत्येक वेळी त्याच्याकडे मदत मागू शकत नाही. एक व्यक्ती तरी किती करू शकतो? मी त्यांना माझ्या सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितलेले नाही, पण मला खात्री आहे की, जर त्याला हे समजले, तर तो नक्कीच माझ्यासोबत उभा राहिल".
हरीश राय यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत अनेक दमदार भूमिका केल्या. 'ओम', 'समारा', 'बेंगळुरू अंडरवर्ल्ड', 'जोडी हक्की', 'राज बहादूर', 'संजू वेड्स गीता', 'स्वयंबर', 'नल्ला' आणि 'केजीएफ'चे दोन्ही भागातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या जाण्याने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कायम प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत राहील.