समांथाचा नवा चित्रपट येतोय! अॅक्शन मोडमधील पोस्टर पाहून चाहते म्हणाले "क्वीन इज बॅक"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:51 IST2026-01-07T15:50:36+5:302026-01-07T15:51:15+5:30
समांथाचा 'अॅक्शन' धमाका, साडीतल्या 'रौद्र' रूपाने वेधलं चाहत्यांचं लक्ष

समांथाचा नवा चित्रपट येतोय! अॅक्शन मोडमधील पोस्टर पाहून चाहते म्हणाले "क्वीन इज बॅक"
समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. 'अॅक्शन क्वीन' म्हणूनही ती ओळखली जाते. समांथा सध्या तिच्या बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 'सिटाडेल: हनी बनी'नंतर समांथा आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी 'मा इंती बंगाराम' या तेलुगू चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
समांथा या पोस्टरमध्ये कमालीची 'पॉवरफुल' दिसत आहे. साडी परिधान केलेल्या समांथाच्या चेहऱ्यावरील भाव प्रचंड रागीट दिसत आहेत. या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांनी "क्वीन इज बॅक" अशा कमेंट्स करत तिच्या लूकचे भरभरून कौतुक केले आहे.
पोस्टर रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी टीझर आणि ट्रेलरच्या तारखांबद्दलही महत्त्वाची अपडेट दिली आहे. ९ जानेवारी २०२६ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती समांथाचा पती राज निदिमोरू आणि डीके यांनी केली आहे. तर दिग्दर्शन नंदिनी रेड्डी यांनी केले आहे. समांथाने यापूर्वी राज आणि डीके यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या सुपरहिट वेब सीरीजमध्ये काम केले आहे.
'रक्त ब्रह्मांड'चीही चर्चा
चित्रपटाव्यतिरिक्त समांथा पुन्हा एकदा एका वेब सीरिजमध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे. राज निदिमोरू निर्मित "रक्त ब्रह्मांड" या सिरीजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. एकामागून एक अॅक्शन-पॅक प्रोजेक्ट्समुळे समांथा २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.