समांथासोबत अफेअरच्या चर्चा, राज निदिमोरुची पूर्व पत्नी पोस्ट करत म्हणाली "अविचारी वर्तन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:08 IST2025-09-05T13:58:12+5:302025-09-05T14:08:16+5:30
गेल्या काही दिवसांपासून समांथा आणि राज निदिमोरु यांच्या नात्याबद्दल बोललं जात आहे.

समांथासोबत अफेअरच्या चर्चा, राज निदिमोरुची पूर्व पत्नी पोस्ट करत म्हणाली "अविचारी वर्तन..."
अभिनेता नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. ती प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज निदिमोरू यांना डेट करत असल्याच्या अफवांना आता आणखी जोर आला आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. नुकतंच समांथाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती एका पुरुषाचा हात पकडून आनंदी आणि उत्साही दिसली. या व्हिडीओमध्ये दिसणारा हात राज निदिमोरूचा असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. या व्हिडीओमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
समांथाच्या या रोमँटिक व्हिडीओनंतर, राज निदिमोरूची पूर्व पत्नी श्यामली डे हिने सोशल मीडियावर दोन स्टोरी शेअर केल्यात. श्यामलीने एका स्टोरीमध्ये प्राचीन चीनमधील एक तत्त्वज्ञ लाओझी यांचा विचार "अविवेकी वर्तनालाही शहाणपणाने प्रतिसाद द्या" शेअर केलाय. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये तिनं अली इब्न अबी तालिब यांचे विचार शेअर केले आहेत. त्यात लिहलंय, "वैराग्य म्हणजे तुमच्याकडे काहीही नाही असा अर्थ नाही, तर काहीही तुमच्या मालकीचे नाही असा आहे". तिच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्यामली डे कोण आहे?
श्यामली डे ही देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तिने सहाय्यक दिग्दर्शक, सर्जनशील सल्लागार आणि पटकथा लेखक म्हणून काम केले आहे. 'रंग दे बसंती', 'ओमकारा' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. राज आणि श्यामली आता एकत्र नाहीत. श्यामलीने १४ फेब्रुवारी २०२३ नंतर राजसोबत कोणताही फोटो शेअर केलेला नाही. समांथा आणि राज यांच्यातील डेटिंगच्या चर्चा त्यांच्या 'सिटाडेल हनी बनी' या चित्रपटाच्या शूटिंगपासून सुरू झाल्या आहेत.