ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:06 IST2025-10-05T15:06:15+5:302025-10-05T15:06:37+5:30
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग
Rishabh Shetty Movie Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा: चॅप्टर १' (Kantara: A Legend - Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत भव्यदिव्य असलेला 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच या शानदार थ्रिलर चित्रपटाने जगभरात विक्रमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. 'कांतारा चॅप्टर १'चे विशेष स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे.
'कांतारा चॅप्टर १'चे विशेष स्क्रीनिंग ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे. आपल्या चित्रपटाचे देशातील सर्वोच्च ठिकाणी विशेष स्क्रीनिंग होणे, ही निर्मात्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सन्मानाची गोष्ट मानली जाते. या विशेष स्क्रीनिंगला अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रुक्मिणी वसंत देखील उपस्थित राहणार आहे.
'कांतारा चॅप्टर १'नं किती कमावले?
२ ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा चॅप्टर १'ने आपल्या नावावर विक्रमी कमाईची नोंद केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांतच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे १६० कोटी कमाई केली आहे. इतकंच नाही, तर ऋषभ शेट्टीच्या या थ्रिलर चित्रपटाने जगभरातील २३० कोटी कलेक्शनचा जादुई आकडा ओलांडला आहे.
दिल्लीत पत्रकार परिषद
राष्ट्रपती भवनातील विशेष प्रदर्शनाला उपस्थित राहिल्यानंतर, ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. या चित्रपटाला मिळत असलेले यश ऋषभ शेट्टीसाठी वैयक्तिकरित्या खूप खास आहे.