नागार्जुनच्या कुटुंबातील व्यक्ती झाला 'डिजिटल अरेस्ट'चा बळी, अभिनेत्यानं शेअर केला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:04 IST2025-11-18T12:02:23+5:302025-11-18T12:04:14+5:30
अभिनेता नागार्जुननं नुकतंच एक मोठा खुलासा केला आहे.

नागार्जुनच्या कुटुंबातील व्यक्ती झाला 'डिजिटल अरेस्ट'चा बळी, अभिनेत्यानं शेअर केला थरारक अनुभव
इंटरनेटचा आयुष्यात शिरकाव झाल्यामुळं आयुष्य सोपं झालं आहे, पण त्याचबरोबर अडचणींमध्येही वाढ झाली आहे. आधी मेसेजवर लिंक यायची क्लिक केलं की बँक खात्यातील सगळे पैसे गायब. नंतर पैसे लकी ड्रॉ, लॉटरी लागल्याचे सांगून सायबर ठग लुटायचे. पण, आता त्यांनी थेट डिजिटल अरेस्ट प्रकार सुरू केले आहेत. या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हीडिओ कॉल करतो. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो. ज्येष्ठ अभिनेता नागार्जुन अक्किनेनीनं नुकतंच याबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.
सोमवारी हैदराबादमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत नागार्जुन अक्किनेनी यांनी सायबर घोटाळे आणि पायरेसीबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी त्यांनं थेट त्यांच्या घरातील एक गंभीर अनुभव सांगितला. पत्रकार परिषदेत नागार्जुननं सांगितलं की, चक्क त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य या भयानक 'डिजिटल अटक' घोटाळ्याचा बळी ठरला होता. ही घटना दोन दिवस चालली होती, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
नागार्जुन म्हणाला, "मला आठवतंय, सुमारे सहा महिन्यांपूर्वी माझ्या स्वतःच्या घरात अशीच एक घटना घडली होती. माझ्या कुटुंबातील एका सदस्याला दोन दिवसांसाठी डिजिटल अटक करण्यात आली होती". या घटनेबद्दल बोलताना नागार्जुननं कुटुंबातील त्या सदस्याचं नाव मात्र उघड केलं नाही. पण एवढ्या मोठ्या कुटुंबातील व्यक्तीच अशा सायबर घोटाळ्याचा बळी ठरल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
डिजिटल अटक म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारीतील नवा प्रकार आहे. अटक करण्याची प्रक्रिया अशी असते की, पोलीस येतात आणि तुम्हाला घेऊन जातात. पोलीस कोठडीत ठेवतात. पण, डिजिटल अरेस्ट फ्रॉड करणारे तुम्हाला काही, काही दिवस तुम्ही जिथे आहात, तिथेच अरेस्ट करून ठेवू शकतात. सायबर ठग व्हिडीओ कॉल करतात आणि तुम्हाला पोलीस असल्याचे किंवा सीबीआय अधिकारी, ईडी अधिकारी असल्याचे सांगतात. तुम्हाला कॉलवरून माहिती देतात आणि नंतर धमकवायला सुरूवात करतात. तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे, ज्यात ड्रग्ज आहे किंवा कुठल्या तरी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तुमचे नाव आहे किंवा कुठल्यातरी गंभीर गुन्ह्यात तुमचे नाव असून, आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत, असे सांगतात.
तुम्हाला घाबरवल्यानंतर सायबर ठग म्हणतात की, व्हिडीओ कॉल तुम्ही कट केला, तर आम्ही तिथे येऊन तुम्हाला अटक करू आणि तुरुंगात टाकू. हा घटनाक्रम इतका वेगाने होतो की, कोणत्याही व्यक्तीला काय करावं ते कळत नाही. महत्त्वाचे म्हणजे कॉल केलेल्या व्यक्ती पोलीस ठाणे, ईडी कार्यालय, सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे तुम्हाला दिसते, पण तो चित्रपटासाठी बनतात, तसा सेट असतो. त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की हा व्यक्ती खरंच अधिकारी आहे आणि अटक करेल. तुम्ही घाबरून जाईपर्यंत ते खूप गोष्टी सांगतात. तुम्ही एकदा अडकले की परत सुटणार नाही. तुम्हाला किती वर्षांचा तुरुंगावास होऊ शकतो. तुम्ही घाबरले की, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला पैसे मागतात. त्यांच्या या जाळ्यात अनेक उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा कॉल आला, तर जवळच्या पोलीस ठाण्यात तुम्ही चौकशी करू शकतात.