आंबटशौकिनांसाठी संवादांची आंबटचिंबट फोडणी

By Admin | Published: February 29, 2016 01:33 AM2016-02-29T01:33:49+5:302016-02-29T01:33:49+5:30

रंगभूमीवर अधूनमधून हॉंट नाटकांची लाट येऊन जाते आणि आंबटशौकीन प्रेक्षकांना ती हमखास सुखावून जाते. अशा प्रकारची नाटके पाहणारा खास असा प्रेक्षकवर्ग असतो

Sour taste for dialogues for acetic acid | आंबटशौकिनांसाठी संवादांची आंबटचिंबट फोडणी

आंबटशौकिनांसाठी संवादांची आंबटचिंबट फोडणी

googlenewsNext

रंगभूमीवर अधूनमधून हॉंट नाटकांची लाट येऊन जाते आणि आंबटशौकीन प्रेक्षकांना ती हमखास सुखावून जाते. अशा प्रकारची नाटके पाहणारा खास असा प्रेक्षकवर्ग असतोच आणि त्यांची ती गरज पूर्ण व्हावी म्हणून अशा लाटा रंगभूमीवर येत राहतात. २ बायका चावट ऐका हे नाटक या लाटेत फिट्ट बसते.
रूपा आणि पारू या दोन युवती एका हॉटेलच्या रूमवर एका सिनेमाच्या आॅडिशनसाठी येतात. या आॅडिशनच्या माध्यमातून निर्माण होणारा सिनेमा बोल्ड असल्याने त्या दोघींना चावट बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागेल, असे त्यांना फोनवरून सुचवले जाते. परिणामी, त्या रूममध्ये या ना त्या कारणाने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चावट बोलण्याची प्रॅक्टिस त्या दोघी सुरू करतात. यातून द्वयर्थी संवादांचा धबधबा नाटकात वाहत राहतो. हे सर्व एकदाचे पार पडल्यावर नाटकाच्या शेवटी सगळा पोलखोल होतो आणि नाटक मार्ग बदलत चक्क सोज्वळपणाचा अवतार धारण करते.
या नाटकाने खरं तर कास्टिंग काऊच या प्रकाराशी संबंधित विषय हाताळला आहे; परंतु या गंभीर विषयाला आंबटचिंबट फोडणी देऊन त्याचे स्वरूप निव्वळ एन्टरटेनमेंटमध्ये बदलले आहे. त्यामुळे संदेशापेक्षा यातले संवादच भारी झाले आहेत. पण याचे सोयरसुतक बाळगण्याचे कारण या नाट्यकर्त्यांना वाटले नसावे. यातली झिंग आणणारी भाषा हे या नाटकाचे ताट आहे आणि त्यातला संदेश हा केवळ तोंडी लावण्यासाठी आहे. सुदेश म्हशीलकर व संतोष कोचरेकर या लेखकद्वयीने हे नाटक कागदावर उतरवले आहे. नाटकातल्या दमदार आणि तोडीस तोड संवादांनी या नाटकाची आवश्यक ती गरज भरून काढली आहे. सुदेशनेच या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. केवळ काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून कदाचित त्याने दिग्दर्शन करण्याचे मनावर घेतले असावे, हे जाणवत राहते. आसावरी तारे आणि प्रियंका शेट्टी या दोघींनी अभिनयाचा भार वाहिला आहे. त्यांच्या बेधडक संवादी भूमिका नाटकाच्या संहितेनुरूप आहेत आणि त्यांनी त्या समरसून केल्या आहेत. विशेषत: आसावरी तारे हिचा गावरान ठसका लक्षात राहणारा आहे. संतोष मयेकर या गुणी नटाने यात विविध भूमिका रंगवल्या आहेत; मात्र त्याने अशा प्रकारच्या हॉंट नाटकात भूमिका साकारणे हीच एक हॉट न्यूज म्हणावी लागेल. मधू शिंदे यांनी त्यांच्या परीने यात रंग भरले आहेत. नाटकाचे नेपथ्य व यात वापरलेली रंगसंगती नाटकाच्या कथेची गरज पूर्ण करणारी आहे. महाराष्ट्र रंगभूमी या संस्थेने निव्वळ आंबटचिंबट अनुभव देण्यासाठी रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाच्या वाट्याला कुणी जावे आणि कुणी जाऊ नये हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.

Web Title: Sour taste for dialogues for acetic acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.