"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:17 IST2025-10-03T12:17:16+5:302025-10-03T12:17:48+5:30
कबीर हे माझं पूर्ण विश्वच आहे. तो अजून लहान आहे तोपर्यंत...

"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे 'आभास हा' या गाण्यामुळे ओळखली जाते. शिवाय ती 'मुरांबा' या गाजलेल्या मालिकेतही काम करत होती. मात्र तिने मालिका मध्येच सोडली. स्मिताचा घटस्फोट झाला असून तिला एक लहान मुलगा आहे. मुलाला वेळ द्यायचा कारणाने तिने मालिका सोडली. ती सध्या स्वत:चं युट्यूब चॅनल चालवते. तसंच मराठी ऐतिहासिक सिनेमांमध्ये दिसते. सिंगल मदर असल्याने नुकतंच तिने लेकासोबतच्या तिच्या एकंदर आयुष्यावर भाष्य केलं.
'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत स्मिता शेवाळे म्हणाली, "कबीर हे माझं पूर्ण विश्वच आहे. तो अजून लहान आहे तोपर्यंत त्याला मी हवी आहे. खरं सांगायचं तर मला तो जास्त हवा आहे. त्यामुळे त्याची किती गरज आहे मला माहित नाही पण माझी खूप गरज आहे. मला वाटतं मी आई झालीये तर मला तो आईपण पूर्ण अनुभवता आलं पाहिजे. तो जसा मोठा होतोय ती ती स्टेज वेगळी आहे. एखादा क्षण सुटला तर पुन्हा येणार नाही. टीनएजनंतर त्यांचं स्वत:चं आयुष्य सुरु होतं तोपर्यंत त्याला आई हवीये. मी त्याच्याकडून खूप काही शिकतही असते. कधी कधी त्याच्या बोलण्यातून मला माझे बाबाच बोलतायेत असा भास होतो."
ती पुढे म्हणाली, "मी अनेकदा त्याला सेटवर घेऊन जाते. नवीन सिनेमाची स्क्रिप्टही मी त्याच्यासमोर वाचते. मी काय काम करते याबद्दल त्याला नेहमीच आतुरता असते. तसंच तो इतक्या लहान वयातही खूप समजूतदार आहे. आपल्या आईने हा वेळ आपल्यासाठी दिला आहे. यासाठी तिने करिअरमधल्या काही गोष्टींचा त्यागही केला आहे याची जाणीव त्याला असते. म्हणून तो मला खूप धीर देतो. जेव्हाही काम असतं तेव्हा तो सगळं त्याचं त्याचं करतो. तू माझी काळजी करु नकोस, तू कामाला जा असं म्हणतो. मुलांना हे शिकवावं लागत नाही तर त्यांच्यात ते आपसूक येतं."
स्मिताने २०१३ रोजी निर्माता राहुल ओडकशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर १२ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत. स्मिता दिग्पाल लांजेकरांच्या आगामी 'अभंग तुकाराम' सिनेमात दिसणार आहे.