"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:14 IST2025-10-03T11:14:07+5:302025-10-03T11:14:53+5:30
त्याने अपहरण केलं तरी स्त्रीला आदर दिला, पण आजच्या काळात...सिमी गरेवालची पोस्ट वाचा

"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा सण उत्साहात साजरा झाला. या सणाला रावणाचं दहन केलं जातं. यावर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी आल्याने गांधी जयंतीही साजरी झाली. दरम्यान दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. त्याच रावणाबद्दल एका बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. तिच्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
७०-८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सिम्मी गरेवालने दसऱ्याच्या दिवशी पोस्ट शेअर केली. ती लिहिते, "प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आम्ही वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. पण खरं पाहता... तुझं वर्तन हे वाईट नसून थोडं खोडकर होतं हे आता समजून घेतलं पाहिजे. शेवटी तू असं काय केलं होतंस? मान्य आहे तू घाईघाईत एका स्त्रीचं अपहरण केलं होतं पण नंतर तू तिचा जो आदर केलास तो आजकालच्या जगात कदाचितच कोणी करत असावं. तू तिला चांगलं अन्न पुरवलं...निवारा दिला आणि अगदी महिला सुरक्षारक्षकही तिच्यासाठी तैनात केलेस.(हा, ते काय दिसायला फार चांगले नव्हते.)
तू तिला नम्रपणे लग्नाची मागणी घातलीस आणि तिने नकार देताच तू तिच्यावर अॅसिड हल्ला केला नाहीस. इतकंच नाही तर प्रभू श्रीरामाने तुला मारलं तेव्हाही तू समजूतदारपणे माफीही मागितलीस. मला खात्री आहे की आमच्या संसदेतील लोकांपेक्षा तू जास्त शिकलेला होतास. मित्रा माझ्यावर विश्वास ठेव, तुला जाळताना आमच्यात मनात अजिबातच कठोर भावना नाहीत. ही फक्त एक प्रथा आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा."
सिमी गरेवालच्या या पोस्टवरुन मोठा वाद झाला. तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. तिने रावणाची तुलना आजच्या काळातील गुन्ह्यांशी केली आणि रावण तितका वाईट नव्हता हे सांगितलं. मात्र लोकांना हे अजिबातच रुचलं नाही. शेवटी सिमीने तिची पोस्ट नंतर डिलीट केली.