'दृश्यम 2' मध्ये छोटी भूमिका ते JNU सिनेमात लीड रोल, बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा सिद्धार्थ बोडके

By कोमल खांबे | Published: April 11, 2024 05:20 PM2024-04-11T17:20:18+5:302024-04-11T17:20:49+5:30

Siddharth Bodke Interview : 'दृश्यम'मुळे नशीब बदललं! JNU सिनेमात मराठमोळ्या सिद्धार्थ बोडकेची मुख्य भूमिका

siddharth bodke interview marathi actor will seen in jnu bollywood movie after drishyam 2 | 'दृश्यम 2' मध्ये छोटी भूमिका ते JNU सिनेमात लीड रोल, बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा सिद्धार्थ बोडके

'दृश्यम 2' मध्ये छोटी भूमिका ते JNU सिनेमात लीड रोल, बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा सिद्धार्थ बोडके

असे अनेक मराठी कलाकार आहेत, ज्यांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येही त्यांचं स्थान निर्माण केलं. या कलाकारांच्या यादीत आता सिद्धार्थ बोडके हे नावही जोडलं गेलं आहे. मराठी रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर सिद्धार्थने 'दृश्यम २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याच्या हाती मोठा सिनेमा लागला आहे. 'JNU - जहांगीर नेहरू युनिव्हर्सिटी' या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. 'JNU' मध्ये तो सौरभ शर्मा हे पात्र साकारताना दिसणार असून २६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थशी साधलेला खास संवाद.

JNU सिनेमा तुझ्याकडे कसा आला? या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? 

बॉलिवूडमध्ये काम मिळवणं तसं कठीण आहे आणि जेव्हा मुख्य भूमिका साकारायला मिळते. तेव्हा तर ही खूपच मोठी गोष्ट असते. 'दृश्यम २' सिनेमातील माझं काम आवडल्याने JNU सिनेमाचे दिग्दर्शक विनय शर्मा यांनी मला बोलवलं होतं. जेव्हा मला पहिल्यांदा समजलं की मला मुख्य भूमिका मिळाली आहे. तेव्हा मी खूप खूश झालो होतो. पण, त्याबरोबरच माझ्यावर ती भूमिका योग्यरित्या साकारण्याची जबाबदारीदेखील होती. आधी जे काम केलंय त्यापेक्षा चांगलं करता आलं पाहिजे. हा सिनेमा कॉलेज जीवनातील राजकारणावर आधारित आहे. JNU मध्ये मी साकारलेलं पात्र हे मिर्झापूरचं आहे. त्यामुळे ती भाषा शिकून घेणं आणि बोलणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. सीन करताना भाषेमुळे काही अडचण येऊ नये, यासाठी मी मिर्झापूरच्या भाषेतील कंटेट बघतिला. कॉलेजमध्ये असताना स्टुडंट पॉलिटिक्स मी फक्त लांबून बघितलं होतं. पण, या सिनेमाच्या निमित्ताने मला या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. मी या भूमिकेसाठी दोन्ही विचारधारांचा अभ्यास केला. मी या सिनेमासाठी २०० टक्के मेहनत घेतली आहे आणि याचं समाधान आहे. 

अनेक सिनेमांना प्रपोगंडाचा शिक्का बसतो, याकडे तू कसं पाहतोस? JNU वर असा शिक्का बसेल असं वाटतं का?

सोशल मीडियामुळे लोकांची मतं आपल्याला कळतात. त्यामुळे प्रपोगंडा सिनेमा आहे, असं तर लोक म्हणतातच. पण, त्याबरोबरच सिनेमाचं कौतुक करणारेही प्रेक्षक आहेत. सिनेमा पूर्ण बघितल्यानंतर लोकांनी तो प्रपोगंडा आहे की नाही हे ठरवावं. JNU हा प्रपोगंडा सिनेमा आहे, असं म्हणता येणार नाही. लेखक आणि दिग्दर्शकाने अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलेली ही गोष्ट आहे. JNU नावामुळे सिनेमा खूप सिरियस वाटतो. अनेक गंभीर मुद्द्यांवर या सिनेमातून भाष्य केलं गेलं आहे. पण, हा सिनेमा तितका गंभीर नाही. कॉलेजमधील राजकारण, विद्यार्थ्यांची विचारधारा हे सगळं दाखविण्यात आलं आहे. 

सध्या निवडणुकांचं वारं वाहत आहे. तर या काळात असे राजकीय पार्श्वभूमीचे सिनेमे येणं कितपत योग्य असं वाटतं तुला? सध्या देशात आणि महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय घडामोडींकडे कसं बघतोस?

एका अभिनेत्याला काम करताना राजकीय मत नसावीत, या मताचा मी आहे. कारण, ती भूमिका योग्यरितीने पार पाडावी, ही जबाबदारी असते. या सिनेमाच्या निमित्ताने मी अनेक विचारधारांचा अभ्यास केला. पण, अजूनही मी या सगळ्याचा अभ्यास करत आहे. सिनेमाचा खूप मोठा परिणाम समाजावर होतो, असं मला वाटत नाही. कारण, सिनेमा बघून लोक कोणत्या राजकीय पक्षाला मत द्यायचं हे ठरवत नाहीत. त्यामुळे त्यांना चालना मिळू शकते. पण, त्यांचं मत तयार होत नाही, असं मला वाटतं. 

सेटवर वातावरण कसं असायचं? उर्वशी रौतेला, रवी किशन, पियुष मिश्रा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

सेटवर वातावरण एकदम छान असायचं. सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखकांनी आम्हाला कामासाठी बरीच स्पेस दिली होती. यामुळे मला जास्त चांगलं काम करता आलं. १० वर्षांपूर्वी मी मुंबईत नुकताच आलो होतो. आरे कॉलनीत मी वॉकसाठी गेलो होतो. तिथे पियुष मिश्राही आले होते. मी त्यांचं काम पाहिलं होतं. त्यांना मी फॉलो करायचो. ती माझ्यासाठी फॅन मोमेंट होती. त्यांचा वॉक संपेपर्यंत मी तिथे थांबलो होतो. त्यानंतर आता मी त्यांच्याबरोबर काम केलं. रवी किशन आणि पियुष मिश्रा यांचे सिनेमात फार सीन्स नाहीत. पण, ज्या पद्धतीने ते काम करतात त्यातून त्यांचा कामाचा अनुभव दिसतो. उर्वशीबरोबर माझी खूप पटकन मैत्री झाली. ती सेटवर खूप साधी असते. तिच्या कामाच्या बाबतीत सिन्सिअर असते. ही भूमिका तिच्यासाठी पण नवीन होती. या सिनेमात तिच्याबरोबर माझी दोन गाणी आहेत. एक रोमँटिक गाणं आहे. उर्वशी खूप उत्कृष्ट डान्सर आहे. पण, मी फारसा डान्स केलेला नाही. पण, डान्स करतानाही तिने मला मदत केली. तू अच्छा कर रहा है, असं ती म्हणत ती मला प्रोत्साहन द्यायची. आम्हाला दोघांनाही कॉफी खूप आवडते. त्यामुळे सेटवर आमच्या खूप गप्पा व्हायच्या. 

बॉलिवूडमध्ये काम करायला मिळेल, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, जेव्हा पहिल्यांदा दृश्यमची ऑफर आली तेव्हा काय मनात आलं होतं? 

मी दृश्यम सिनेमा पाहिलाच नव्हता. लॉकडाऊमधील गोष्ट आहे. तेव्हा तितीक्षा, मी आणि खुशबू एकत्र बसलो होतो. तितीक्षाने विचारलं की दृश्यम बघायचा का? तेव्हा मी तिला म्हणालो की मी सिनेमा पाहिलाच नाहीये. तेव्हा मी पहिल्यांदा सिनेमा पाहिला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच आठवड्यात मला दृश्यम २ साठी फोन आला. पण, मी वेगळ्याच भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. दृश्यममधील कुटुंबाच्या बाजूला राहणाऱ्या जोडप्यातील अंडरकॉप एजेंटच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशन आवडल्याने त्यांनी दुसऱ्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतलं आणि ती भूमिका मला मिळाली. जेव्हा आपल्याला ऑडिशनमधून निवडलं जातं. तेव्हा आपला आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यांनी आपलं काम बघून आपल्याला काम दिलं आहे, हे आपल्याला माहित असतं. मला स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मला फक्त माझे सीन्स माहीत होते. पण, जेव्हा सेटवर गेलो तेव्हा कळलं की हा सिनेमासाठी महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे मी उत्सुक असतो. 

मराठी कलाकारांकडे बॉलिवूडमध्ये कशारितीने पाहिलं जातं? मराठी आणि बॉलिवूडमध्ये काम करतांना कोणता फरक जाणवतो? 

मी दोन सिनेमे आणि हिंदी मालिका केली आहे. पण,  दिग्दर्शक किंवा कलाकारांकडूनही मला कधी अशी वागणूक मिळाली नाही. याउलट माझ्या कामाचं कौतुकच झालं. नेपोटिझम या गोष्टी आहेत. त्या आपण नाकारू शकत नाही. पण, आपण खूप काम करावं. कामामुळे काम मिळतं, या मताचा मी आहे. सुरुवातीला अनेकांना सेटवर कळायचं नाही की मी मराठी आहे. कारण, मी त्या गेटअपमध्ये असायचो आणि मी हिंदीत बोलायचो. त्यामुळे मी मराठी आहे, असं पटकन कोणाला कळलं नसेल. पण, जेव्हा पहिला सीन झाला. तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मग ते तुमच्याबरोबर जास्त इंटरॅक्ट होतात. 

कोणते निकष पाहून सिनेमाची निवड करतो? तुझ्या करिअरमध्ये किंवा भूमिका निवडताना तितीक्षाची काही मदत होते का?

मी खूप प्रामाणिकपणे काम करतो. पण, भूमिका करताना ती मागच्या पात्रासारखी वाटू नये, हा माझा प्रयत्न असतो. तितीक्षा तर माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही भूमिकाही एकमेकांबरोबर चर्चा करतो. तुला आतून वाटत असेल, तर काही झालं तरी नको करूस. असं ती मला सांगते. काही भूमिकांबाबत कधी कधी निर्णय घेणं कठीण जातं. मग, तेव्हा आम्ही विचार करून मिळून निर्णय घेतो. मी खूप भाग्यवान आहे की अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. जी आता माझी बायको आहे. 

आता पुढे सिद्धार्थ कोणत्या नव्या भूमिकांमध्ये दिसणार आहे? आणि कोणाबरोबर काम करण्याची इच्छा आहे

मला पंकज त्रिपाठींबरोबर काम करायचं आहे. आलिया भट आणि इतर सर्वच चांगल्या कलाकारांबरोबर काम करायला आवडेल. मी आधी बऱ्याच मिनी सीरिज केल्या आहेत. पण, मला आता नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइम सारख्या प्लॅटफॉर्मवरची वेब सीरिज करायला आवडेल.

Web Title: siddharth bodke interview marathi actor will seen in jnu bollywood movie after drishyam 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.