श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 10:41 IST2025-11-22T10:39:18+5:302025-11-22T10:41:08+5:30
आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
२०२० साली अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर ड्रग्सचे आरोप झाले होते. आर्यन खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, भारती सिंह अशी मोठी नावं समोर आली होती. अजूनही बॉलिवूड कलाकारांवरुन ड्रग्सचं सावट गेलेलं नाही. आता श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर २५२ कोटी ड्रग्स पार्टी केसमध्ये अडकला आहे, मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक सिद्धांत कपूरला अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स पार्टीसंबंधी मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेल (ANC)ने चौकशीसाठी बोलवलं आहे. हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, २५ नोव्हेंबरला सिद्धांत कपूरला हजर राहण्याचे आदेश आहेत. ही चौकशी या महिन्याच्या सुरुवातीलाच एका ड्रग्स माफियाच्या चौकशीवेळी केलेल्या दाव्यांमधून सुरु झाली. त्याने अनेक प्रसिद्ध कलाकारांसाठी आलिशान पार्ट्यांचं आयोजन केल्याचा दावा केला होता. नुकतंच एएनसीने सर्वात मोठ्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. दाऊद इब्राहिमचा सहयोगी असणारा सलीम डोला हा ड्रग माफिया असल्याचा संशय होता. पोलिसांनी संशयित मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेखला गेल्या वर्षी दुबईतून अटक केली होती.
रिपोर्टनुसार, सलीम डोलाचा मुलगा ताहिरने दावा केला की बॉलिवूड कलाकार, मॉडेल, रॅपर, फिल्ममेकर आणि दाऊदचे नातेवाईक भारत आणि परदेशात ड्रग्स पार्ट्यांमध्ये सामील झाले होते. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर, नोरा फतेही, झीशान सिद्दिकी, हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, ओरी, अब्बास मस्तान आणि रॅपर लोका यांचं नाव या ड्रग्स केसमध्ये समोर आलं आहे. मुंबई क्राइम ब्रांच या कलाकारांचा जबाब नोंदवून घेत आहे.