"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री

By कोमल खांबे | Published: March 27, 2024 03:34 PM2024-03-27T15:34:40+5:302024-03-27T15:38:37+5:30

'शुभविवाह' मालिकेत मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या काजलने तिच्या अभिनयातील प्रवासाबद्दल 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. 

shubhvivavh fame kajal patil interview actress journey travelled from pune to mumbai for audition | "ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री

"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री

कलाकार व्हावं, टीव्हीवर दिसावं हे अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न उराशी बाळगून मनात आशा पल्लवित करून आणि डोळ्यात नवी उमेद घेऊन मुंबईच्या स्वप्ननगरीत पुण्याची मुलगी काजल पाटीलने पाऊल ठेवलं. कोणताही गॉडफादर नसताना मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर ती स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अवघ्या १६व्या वर्षी मालिकेत काम मिळालेल्या काजलची अभिनयाची सुरुवात प्रायोगिक नाटकापासून झाली. सध्या 'शुभविवाह' मालिकेत मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या काजलने तिच्या अभिनयातील प्रवासाबद्दल 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. 

अशी झाली अभिनयाची सुरुवात

मला लहानपणापासूनच याची आवड होती. स्पोर्ट्स, अभिनय या सगळ्या गोष्टींमध्ये मी हिरीरिने भाग घ्यायचे. अभ्यासापेक्षा मला या गोष्टी करण्यात आनंद मिळायचा. मला हे सगळ्यात करण्यात मजा यायची. त्यानंतर मग पुण्यात कॉलेजमध्ये असताना मी थिएटर करायला लागले. तेव्हा मला जाणवलं की मला हेच आवडतं आणि मला हेच करायचं आहे. दिवसभर थिएटर करून मी रात्री अभ्यास करायचे. 

ऑडिशनसाठी पुणे-मुंबई प्रवास आणि पहिल्या मालिकेसाठी सिलेक्शन

मी सुरुवातीला पुण्यातील प्रायोगिक नाटकाचं थिएटर आणि बॅकस्टेज करायला लागले. प्रायोगिक थिएटर करताना मी ऑडिशनही देत होते. ऑडिशनसाठी मुंबई ते पुणे असा रोज ४ तासांचा प्रवास करायला लागायचा. मुंबईत आमचे कोणीच नातेवाईकही नव्हते. त्यामुळे ऑडिशनसाठी माझी आई माझ्याबरोबर यायची. पुण्याहून मुंबईला आल्यावर मला एखाद्या मॉलमध्ये मी कपडे चेंज करायचे आणि ऑडिशनला जायचे. पण, या प्रवासात मला कधीच बॅकफूटवर जावसं वाटलं नाही. मुंबईत घर असावं, असं मला नेहमी वाटायचं. ऑडिशनदरम्यान माझं 'कुलस्वामिनी' या मालिकेसाठी सिलेक्शन झालं. 'कुलस्वामिनी' मालिकेसाठी मुंबईत यावं लागणार होतं. भाऊ लहान असल्याने माझी आई माझ्यासोबत येऊ शकत नव्हती. मग मी एकटीच १६ वर्षांची असताना मुंबईत आले आणि इथेच रुममेटसोबत राहू लागले. पुण्यात माझा अभिनयाचा पाया भक्कम झाला. पण, मुंबईने मला ओळख दिली. 

किशोरी अंबिये माझी इंडस्ट्रीतील आई

'कुलस्वामिनी' या माझ्या पहिल्या मालिकेत किशोरी अंबिये माझ्या ऑनस्क्रीन आई होत्या.  किशूताई ही माझी आईच आहे. मी नवीन असल्याने तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या. मी मुळची पुण्याची आहे. त्यामुळे मुंबईत एकटीच असायचे. ती रोज माझ्यासाठी सेटवर जेवण घेऊन यायची. खरी आई आपल्याला संस्कार देते. या क्षेत्रातील एथिक्स किशोरी मम्माने मला शिकवले आहेत. त्यामुळे ती माझी आईच आहे. माझी खरी आई अर्चना पाटील आहे. आणि किशू मम्मा ही माझी इंडस्ट्रीमधली आई आहे. किशोरी मम्माला सगळे अमिताभ बच्चन म्हणतात. कारण, ती नेहमी वेळेवर सेटवर हजर असते. ही एक मोठी गोष्ट मी तिच्याकडून शिकले. आपण मोठे होत असताना आपल्या मागे एक टीम असते, असं ती मला नेहमी म्हणायची. तुमच्यामागे ५० लोक काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला नेहमी ही जाणीव असायली हवी. कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत. मी लहान असल्यामुळे तिचं सगळं ऐकलं. हे संस्कार मला तिच्याकडून मिळालं. म्हणून मी तिला खूप मानते.

कमी फॉलोवर्समुळे भूमिका नाकारल्या

माझे फॉलोवर्स कमी असल्यामुळे १-२ भूमिका नाकारल्या गेल्या. पण, मला याचं वाईट वाटलं नाही. कारण, असे खूप कमी लोक आहेत. ज्यांचे कामामुळे फॉलोवर्स वाढले आहेत. आज तसं बघायला गेलं तर सगळेच रील करतात. आर्टिस्टही करतात, चांगले कलाकारही करतात आणि सोशल मीडिया स्टारही करतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडिया लोकांना सोपं वाटत असलं तरी सक्रिय राहणंही तितकंच गरजेचं आहे आणि ते अवघडही आहे. दुसरं म्हणजे, आम्ही जे काम करतो ते रील करण्यापेक्षा फार वेगळं आहे. त्यामुळे फॉलोवर्स आहेत म्हणून तुम्हाला काम मिळेल. पण, त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास किती टिकवून ठेवता. त्यावरच तुम्हाला पुढचं काम मिळतं. मला वाटतं कुठे ना कुठे रीलस्टार हे उघडे पडतातच. काम करायला लागल्यावर कळतं की हे कलाकार नाहीत. पण, मला यावर कधी ब्लेम करावंसं वाटलं नाही. कारण, एक प्रोफेशन म्हणून तेदेखील अवघड आहे. पण, फॉलोवर्स बघून काम देणं, हे चुकीचं वाटतं. 

इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव

सुरुवातीला एक दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा. त्याच्यासोबत मी काम केलेलं नव्हतं. पण, त्याचे मला रात्रीच कॉल यायचे. इंडस्ट्रीत आल्यानंतर ९-१० वाजल्यानंतर कोणाचेही फोन उचलायचे नाहीत, हे मी ठरवलं होतं. हा नियम मी स्वत:च घालून घेतला होता. कितीही कामाचा फोन असेल, तरीही मी उचलत नाही. कारण, मग ते आपल्याला गृहित धरतात. त्यामुळे काम असेल तर तुम्ही सकाळी फोन करा. यामुळेच मला वाटतं की त्यांनाही कळलं असेल की हे काही होणार नाही. म्हणून तेदेखील बॅकफूटवर गेले असतील. 

आगामी प्रोजेक्ट

सध्या मला मालिकेमुळे दुसरं काही करता येत नाही. कारण, पूर्ण शेड्युल बिझी आहे. मला कमर्शियल नाटकांसाठी विचारणा झाली होती. पण, तिथेही तालमीसाठी वेळ द्यावा लागतो. प्रयोगासाठी बाहेर जावं लागतं. मालिकेमुळे हे शक्य होत नाही. मला नाटक करायला खूप आवडतं. पण, काळजावर दगड ठेवून मला नाही म्हणावं लागतंय. पण, भविष्यात मला कमर्शियल नाटक आणि वेब सीरिज करायला नक्कीच आवडेल.

Web Title: shubhvivavh fame kajal patil interview actress journey travelled from pune to mumbai for audition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.