'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:29 PM2024-03-20T13:29:10+5:302024-03-20T13:29:38+5:30
गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्याला हृदयविकाराचा धक्का आला. एवढ्या फिट अँड फाईन श्रेयसला हार्ट अटॅक आला यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता.
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) बरा होऊन पुन्हा कामावर परतला आहे. गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्याला हृदयविकाराचा धक्का आला. एवढ्या फिट अँड फाईन श्रेयसला हार्ट अटॅक आला यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. मात्र ते घडलं होतं. १० मिनिटांसाठी माझा श्वास थांबल्याचं आणि मी clinically dead असल्याचं तो नंतर मुलाखतींमध्ये म्हणाला. कुटुंबाची साथ आणि चाहत्यांची प्रार्थना यामुळे श्रेयसला हा दुसराच जन्म मिळाल्यासारखं आहे. 'वेलकम टू जंगल'च्या शूटवरुन परतताना श्रेयसला अटॅक आला होता. तर आता त्या घटनेनंतर अडीच महिन्यांनी श्रेयस पुन्हा या सिनेमाच्या शूटवर परतला आहे.
'वेलकम टू जंगल'च्या सेटवर आल्यानंतर श्रेयस म्हणाला, " खूपच संमिश्र भावना आहेत. मी तुम्हाला सांगू शकत नाही की कामावर परत येण्यापूर्वी मी किती नर्व्हस होतो. परत काही गडबड व्हायला नको असंच माझ्या मनात येत होतं. मी सतत माझे हार्ट रेट तपासत होतो. मला खूपच घाबरायला होत होतं. डॉक्टरांनी मला अजिबात स्ट्रेस न घेण्याचा सल्ला दिला. हळूहळू काम कर, नॉर्मल शूट, डायलॉग सीन्स कर असं ते म्हणाले. तसंच त्यांनी मला अॅक्शन सीन्स करायला नकार दिला आणि वजन उचलू नको असंही सांगितलं. हे सगळं करण्यासाठी आणखी ४ ते ६ महिने लागतील."
सध्या श्रेयस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काम करत आहे. त्याच्या कुटुंबातच हार्ट अटॅकची हिस्ट्री असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आधी काका, नंतर वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्यानेच निधन झालं होतं. श्रेयसच्या या कठीण काळात अक्षय कुमार आणि अहमद खान यांनी त्याच्या कुटुंबाला आधार दिला. त्याने दोघांचेही आभार मानले आहेत.
श्रेयसचा नुकताच 'ही अनोखी गाठ' मराठी सिनेमा रिलीज झाला. यामध्ये गौरी इंगावले आणि त्याची फ्रेश जोडी बघायला मिळाली. शिवाय श्रेयसने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही घोषणा केली आहे. 'पुष्पा' मध्ये अल्लू अर्जुनसाठी डबिंग केल्यानंतर आता सीक्वेलमध्येही डबिंग करण्याची त्याची इच्छा त्याने बोलू दाखवली. शिवाय 'वेलकम टू जंगल' सिनेमाचं शूटही त्याने पुन्हा सुरु केलं आहे.