"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:34 IST2025-10-31T11:32:37+5:302025-10-31T11:34:15+5:30
शिल्पा शिंदेने वर्षाभरातच मालिका सोडली होती, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा अंगुरी भाभी बनून येणार?

"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे आता पुन्हा या मालिकेत कमबॅक करत असल्याची कालपासून चर्चा आहे. शिल्पाला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती. तिची अंगूरी भाभीची भूमिका खूप गाजली. मात्र वर्षभरातच तिने ही मालिका सोडली होती. अभिनेत्री शुभांगी अत्रेने तिला रिप्लेस केलं होतं. शुभांगीलाही या भूमिकेत चांगलं यश मिळालं. आता ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदे पुन्हा 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेत येणार अशा बातम्या आहेत. दरम्यान या चर्चांवर शिल्पा शिंदेने उत्तर दिलं आहे.
'झूम'शी बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली, "मला सकाळपासूनच बरेच फोन येत आहेत. मी एका दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी आता वेगळ्याच जगात गेले आहे. मनोज संतोषी यांच्यासोबत मी होते आणि मी भाभीजी घर पर है मध्ये कमबॅक करावं अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. आता मनोजजी आपल्यात नाहीत पण मला नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करायला आवडेल. मन का हो तो अच्छा, न हो तो और भी अच्छा असं मी नेहमीच म्हणते."
ती पुढे म्हणाली, "मी सध्या यावर गांभीर्याने विचार केलेला नाही. कारण यात मोठी रिस्क आहे. सध्या या केवळ चर्चा आहेत, पण काहीच ठरलेलं नाही. मालिकेतून आम्ही प्रेक्षकांना खूप हसवलं. त्याला १० वर्ष झाली आहेत. आता कथेत काही बदल करावे लागणार आहेत. लोकांना वाटतंय की मी कमबॅक करत आहे, तर हो, माझी मेकर्सशी चर्चा सुरु आहे. मला एका वेगळ्या शोसाठी सुद्धा अप्रोच करण्यात आलं आहे. अजून काहीच फायनल झालेलं नाही. या फक्त चर्चा आहेत."
"जर अंगूरी भाभी बददली तर ती पहिल्यासारखी नसेल. नशिबात काय लिहिलंय माहित नाही. सर्वांसाठीच ही रिस्क असणार आहे. सगळं काही योगायोगाने होतं. अजूनपर्यंत मी होकार किंवा नकारही दिलेला नाही. जर मी केलंच तर मनोजजी आणि माझ्या चाहत्यांसाठी करेन. मी खूश आहे पण आधी जे घडलं होतं ते चांगलं नव्हतं. पण तरी लोकांनी मला भाभीजी म्हणून खूप प्रेम दिलं आहे", असंही ती म्हणाली.
