टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 03:43 PM2023-07-30T15:43:10+5:302023-07-30T15:44:44+5:30

शरद पोंक्षेंच्या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.

Sharad Ponkshe's attack on critic netizens?, Undir Vati gave an example of rat | टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण

टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टी, नाटक, मालिकांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाली. यानंतर शरद पोंक्षे यांनी लेकीचे कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. दरम्यान, त्यांच्या पोस्टमधील एका वाक्याने मात्र सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यांनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केल्याने नेटकरी चांगलेच संतापले. नेटकऱ्यांनी कमेंट करत पोंक्षेंना खडेबोल सुनावले. तर, अभिनेता किरण माने आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही जोरकसपणे सुनावलं होतं. आता, शरद पोंक्षेंनी पुन्हा फेसबुक पोस्ट करत नेटीझन्सला प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे. 

शरद पोंक्षेंच्या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. पोंक्षेंना आरक्षणवाले डोळ्यात खुपतात असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे यावेळी सर्वांनी त्यांच्या मुलीचं अभिनंदनही केलं आहे. मात्र, शरद पोंक्षेंना चांगलंच झापलं होतं. आता, पोंक्षे यांनी पुन्हा एक पोस्ट लिहित ट्रोल करणाऱ्यांना सुनावल्याचं दिसून येतय. मात्र, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कुठेही कोणाचा उल्लेख केला नाही. केवल उंदीर आणि वातीचं उदाहरण दिलंय. मात्र, त्यांच्या या पोस्टवरही नेटीझन्सने त्यांना ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. 

''आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो,तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो, तस झाल.आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली.नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?'', असा सवाल पोंक्षे यांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. 

शरद पोंक्षे यांची पहिली पोस्ट काय ?

शरद पोंक्षे यांनी लेकीचे फोटो शेअर करत लिहिले, "कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता चौथीपासून तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा."

सुषमा अंधारेंची टीका

शरदराव, भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. हे माहिती असेलच तुम्हाला.  उलट ज्याच्यामध्ये कमालीचे बाहुबल आहे,  भल्या-भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा.  हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठले जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलेच आहे. अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किंवा वांशिक  निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेषष्ट्यांना अजिबात कळणार नाही. आणि हो ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहिलत ना, त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज शक्य असताना सुद्धा माझे संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे 
 

Web Title: Sharad Ponkshe's attack on critic netizens?, Undir Vati gave an example of rat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.