कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे वाद, सयाजी शिंदेंची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:44 IST2025-11-21T15:34:11+5:302025-11-21T15:44:32+5:30
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे वाद, सयाजी शिंदेंची सरकारवर टीका
Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा कोट्यवधी भाविकांसाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो, पण या भव्य आयोजनाची किंमत निसर्गाला मोजावी लागणार असल्याचं दिसतंय. कुंभमेळ्यासाठी नाशिकच्यातपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही थेट सरकारला खडे बोल सुनावत आपला संताप व्यक्त केला आहे.
टिव्ही ९ मराठीशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, "नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला अनेक फोन येत आहेत. एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान गिरीश महाजन यांनी केलं. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही किंवा त्यांचे विधान बेजबाबदार आहे. असं बोलून ते काय चेष्टा करत आहेत का. तपोवनामध्ये जुनी झाडे आहेत. ते म्हणत आहेत की एक झाड तोडून दहा झाडे लावू. आम्ही म्हणतोय की एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं मरायला तयार आहोत, पण ते झाड तोडू देणार नाही".
पुढे ते म्हणाले, "नागपूरातही झाडे तोडली जात आहे. तसेच लोणंद रस्त्यावर वृक्षतोड केली जात आहेत. त्या रस्त्यावरील ४०० झाडे ही वडाची आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष बेपर्वाईने तोडला जातोय. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे तो. सरकार कधी जागं होणार आहे. कधी कायदा करणार आहे. एक वृक्ष तोडल्यावर १ ते २ हजार रुपयांचा दंड होतो. ही काय शिक्षा आहे. असं भयानक चित्र आहे. मनुष्य जात ही लवकर संपणार आहे, त्यानंतर झाडे संपतील, हे कुणी लक्षात घेत नाही. झाडे लावण्याच्या वेगापेक्षा झाडे तोडण्याचा वेग आपल्याकडे जास्त आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे".
एबीपी माझाशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, "सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागते आहे. माझ्या तोंडात शिव्या येतात, इतका राग येतोय. झाडांच्याबाबतीत सरकार चुकीचं वागतं, याचा मला फार अनुवभव आहे. मला सूचत नाही अजून काय करावं. आपल्या डोळ्यासमोर जी झाडे तोडली जात आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत. नाहीतर एक दिवस माणसं पेटून उठतील. राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजेत. आपल्याकडे लोकशाही आहे की हुकुमशाही हेच समजत नाही. झाडांवर राजकारण करू नका. लोकांनी आवाज उठवला की तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण बोलणाऱ्याला बोलता आले पाहिजे. सगळेच आता ढोगींपणा करत आहेत. हे सर्वांना कळतंय. आता त्याचा उद्रेक होण्याची वेळ आली आहे".