सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 18:32 IST2025-10-05T18:32:14+5:302025-10-05T18:32:49+5:30
'सखाराम बाइंडर' नाटकाच्या माध्यमातून सयाजी शिंदेंचा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
Sayaji Shinde Financial Aid Flood Victims Farmers Marathwada: मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानं मराठवाड्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर पुराच्या पाण्यामुळे शेतातील सुपिक मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे. आता अभिनेते सयाजी शिंदे हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी त्यांच्या 'सखाराम बाईंडर' नाटकाच्या १० प्रयोगांचे मानधन राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.
विजय तेंडुलकर यांच्या गाजलेल्या 'सखाराम बाईंडर' या नाटकाच्या निमित्ताने सयाजी शिंदे यांनी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच दिल्लीत पार पडला आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या यशानंतर लगेचच, राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी यावेळी दिली आहे. तर सयाजी शिंदे हे सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ १ रुपया मानधन घेऊन करणार आहेत. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल. यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, "मराठवाडा पावसावाचून मरत होता, आता तो पावसामुळे मरतोय, इतकी अवस्था वाईट आहे".
सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सयाजी शिंदे यांच्यासारख्या कलाकारांनी सामाजिक भान राखून घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी आहे. दरम्यान
सयाजी शिंदे वृक्षमित्र म्हणूनही ओळखले जातात. वृक्षलागवडीसाठी स्वत: कृती करत त्यांनी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभी केली आहे. सयाजी शिंदे यांनी पर्यावरण रक्षणार्थ भरीव योगदान दिलंय. त्यांनी २०२० साली बीड जिल्ह्यात देशातील पहिले 'वृक्ष संमेलन' आयोजित केले होते, ज्याचे मुख्य उद्दिष्ट वृक्ष लागवड आणि संवर्धन यावर जनजागृती करणे होते. सयाजी यांनी त्यांच्या 'सह्याद्री देवराई' या उपक्रमांतर्गत पालवण येथील उजाड डोंगरावर हजारो झाडे लावली होती.