अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 19:39 IST2025-04-29T19:38:31+5:302025-04-29T19:39:01+5:30
अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. आता तो उदरनिर्वाहासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे.

अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
सिनेइंडस्ट्रीतील ग्लॅमर सर्वांना आकर्षित करते पण इथे टिकून राहणे सोप्पे नाही. असाच एक कलाकार आहे ज्याने एकेकाळी अक्षय कुमार, धर्मेंद्र आणि ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती पण आज तो उदरनिर्वाहासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे. हो, आम्ही अभिनेता सवी सिद्धूबद्दल बोलत आहोत. सवी सिद्धूने एकेकाळी अनेक उत्तम चित्रपट केले होते पण आज त्याला एक-एक पैसा महत्त्वाचा आहे.
सवी सिद्धूने सलमान खानच्या 'पटियाला हाऊस' चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक वर्षांनंतर, सवीने त्याच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्याबद्दल सांगितले आहे. लेटेस्ट मुलाखतीत सिद्धूने सांगितले आहे की त्याच्या संघर्षाच्या काळात तो अनुराग कश्यपला भेटला आणि त्यांच्या एका चित्रपटातही काम केले जो कधीही प्रदर्शित झाला नाही.
अभिनेता कलाविश्वातून पडला बाहेर
सवी सिद्धूने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्याने १९९५ मध्ये आलेल्या 'तकत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. शेवटचा तो आयुषमान खुरानाच्या 'बेवकूफियां' चित्रपटात झळकला. हा चित्रपट २२ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर सवी हळूहळू चित्रपटसृष्टीतून गायब झाला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजितच्या 'आरंभम' चित्रपटातही सवीने काम केले. पण त्याला हळूहळू काम मिळणे बंद झाले आणि त्याने घर चालवण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आता तो वॉचमेन म्हणून काम करतो.
करतोय वॉचमेनची नोकरी
सवी सिद्धू हा लखनऊचा रहिवासी आहे. त्याने लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमेन म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच्या कुटुंबात कोणीही नाही आणि आता तो एकटाच राहतो.