"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:44 IST2025-09-08T11:44:01+5:302025-09-08T11:44:20+5:30

दरवर्षी कलावंत या ढोल-पथकाद्वारे अनेक कलाकार गणपती मिरवणुकीत ढोल वादन करतात. यंदाही हे पथक विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करणार होतं. मात्र डिजेमुळे हे ढोलवादन रद्द करावं लागलं. हा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे.

saurabh gokhale shared bad experience of pune ganpati visarjan mirvnuk couldnt play dhol because of dj | "डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

गेले १० दिवस सगळीकडेच गणेशोत्सवामुळे वातावरण मंगलमय झालं होतं. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी शनिवारी ढोल ताशाच्या गजरात निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनाला निघणाऱ्या पुण्यातील मिरवणुका हा कायमच चर्चेचा विषय असतो. पुण्यात ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत याचं स्वरुप बदलल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशासोबतच आता डिजेही दिसतात. पण, यावर्षी मात्र याचा अत्यंत वाईट अनुभव कलावंत या ढोल पथकाला आहे. 

दरवर्षी कलावंत या ढोल-पथकाद्वारे अनेक कलाकार गणपती मिरवणुकीत ढोल वादन करतात. यंदाही हे पथक विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करणार होतं. मात्र डिजेमुळे हे ढोलवादन रद्द करावं लागलं. हा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे. सौरभ म्हणतो, "गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आला. मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे. आम्ही मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळासोबत वादन करणार होतो. आमची संध्याकाळी ६ वाजताची मिरवणूक होती. आम्ही बातम्यांमधून एक चांगली गोष्ट ऐकत होतो की लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. विसर्जन अत्यंत वेळेत होतंय. पण, आम्हाला याच्या बरोबर उलट अनुभव आला". 

डिजेपुढे झुकावं लागलं...

"आमची ६ वाजताची मिरवणूक होती आणि वादनासाठी आम्ही सगळेजण बरोबर ६ वाजता तयारही होतो. परंतु, टिळक रोडला चालेला डिजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्यापुढे सगळी मंडळी हतबल झाली होती. मार्केट यार्ड मंडळही हतबल झालं होतं. त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. आम्हीही खूप वेळ वाट पाहिली. पण, अखेरीस या डिजेपुढे मंडळालाही झुकावं लागलं. आणि शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की वादन करता येणार नाही. त्या कर्णकर्कश्य आवाजात रममाण झालेले लोक पाहून आम्हाला वाटलं की वादन नको करायला. कारण एकूण परिस्थिती पाहून असं वाटलं की तिथे येणाऱ्या लोकांना फारसं पारंपरिक वाद्यांबद्दल प्रेम नाही. पण धुमाकुळ घालण्यात अधिक रस आहे. तिथे आलेली गर्दी, चाललेली नृत्य आणि वाजणारं संगीत बघून खरंच खूप मनस्ताप झाला. आणि हे कुठेतरी लोकांपुढे यावं फक्त म्हणून हा व्हिडीओ करतोय", असं त्याने पुढे म्हटलं आहे. 


पुढे सौरभ म्हणतो, "त्यामुळे आम्ही आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि जागच्या जागी एक गजर केला. कारण ध्वज असाच उतरवायचो नसतो. मग ध्वजवंदन करून आम्ही वादनाला पूर्णविराम दिला. याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी ब्रेक लागणं गरजेचं आहे. मला वाटतं आताही वेळ गेलेली नाही. आपण सगळ्यांनी पारंपरिक वाद्यांकडे वळूया. नाहीतर काही दिवसांनी हे घातक होत जाईल आणि याचे वाईट परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतील". 

Web Title: saurabh gokhale shared bad experience of pune ganpati visarjan mirvnuk couldnt play dhol because of dj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.