"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
By कोमल खांबे | Updated: July 23, 2025 13:46 IST2025-07-23T13:46:17+5:302025-07-23T13:46:48+5:30
एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं.

"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नट आहे. अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. संकर्षण एक अभिनेता असण्याबरोबरच उत्तम कवीदेखील आहे. संकर्षण अध्यात्मिक आहे. जेवढी तो रंगभूमीची पूजा करतो. तेवढीच तो देवाचीही करतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संकर्षणने त्यासोबत घडलेला एक अविस्मरणीय आणि अनाकलनीय किस्सा सांगितला. एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं.
संकर्षणने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गणपतीपुळ्याचा हा प्रसंग सांगितला. तो म्हमाला, "मी बाबांना म्हटलं बाबा रत्नागिरीला चाललोय. जमलंच तर गणपतीपुळ्याला दर्शनाला जाईन. तर बाबा म्हणाले मुर्खासारखं असं बोलून बसत जाऊ नको. बोलताना विचार कर. तू कधी गेलास का रत्नागिरीला, गणपतीपुळ्याला...माहितीये का तुला काही? मी त्यांना म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल".
थेट गणपतीपुळ्याच्या मंदिरातून आलं बोलावणं...
पुढे तो म्हणाला, "रत्नागिरीचा प्रयोग झाल्यानंतर एक जोडपं मला भेटायला आलं होतं. सगळे भेटल्यानंतर ते मला म्हणाले तुमच्यासाठी गणपतीपुळ्याचा उकडीच्या मोदकाचा आजचा प्रसाद आणलाय. आज अंगारकी आहे. मी प्रसाद वगैरे खाल्ला. मग त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर ते मला म्हणाले की चला. मी म्हटलं कुठे? ते म्हणाले गणपतीपुळ्याला.. मी त्यांना म्हटलं की मी दर्शनाला जाणार आहे पण...तर ते म्हणाले की मी गाडी घेऊन आलोय. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण? तर ते म्हणाले की मी गणपतीपुळ्याचा पुजारी उमेश घनवटकर. मी त्यांना विचारलं आपलं काही ठरलेलं नसताना तुम्ही मला चला का म्हणालात? त्यावर ते म्हणाले की मला असं वाटलं की तुम्हाला दर्शनाला यायचंय".
"प्रयोग संपल्यावर मी मेकअप काढला बॅग घेतली आणि त्यांच्या गाडीत बसलो. त्यांना सांगितलं मला उद्या सकाळी सोवळ्यात अभिषेक करायचाय. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता ते सोवळं घेऊन आले. माझ्या हातून अभिषेक केला. प्रसाद मिळाला सगळं झालं. मी सहज म्हटलेलं गणपती बाप्पा मला न्यायला येईल...तर अजून काय पाहिजे", असं म्हणत संकर्षणने त्याच्या भावना व्यक्त केल्या.