'या' दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत संजू राठोडला करायचा आहे म्युझिक व्हिडीओ, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:19 IST2025-09-11T15:19:01+5:302025-09-11T15:19:20+5:30
नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं खास इच्छा व्यक्त केली आहे.

'या' दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत संजू राठोडला करायचा आहे म्युझिक व्हिडीओ, म्हणाला...
Sanju Rathod: संजू राठोड हा मराठी चेहरा सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील धनवड (Dhanwad) गावातून आलेल्या संजूला आज देशभरात अनेक जण त्याच्या गाण्यांसाठी ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात. संजू राठोडने मेहनतीने हे सगळं कमावलं असून आज त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात संजूची प्रत्येक गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरतात. 'गुलाबी साडी' असो किंवा 'शेकी' संजू राठोडच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं खास इच्छा व्यक्त केली आहे.
संजू राठोडनं नुकतंच 'झुम'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आलं की "तुला कुणासोबत पुढचं कोलॅबोरेशन कराण्याची इच्छा आहे". या प्रश्नावर उत्तर देताना संजू राठोडने थेट बॉलिवूड अभिनेत्रींची नावे घेतली. संजू म्हणाला, "मला श्रद्धा कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत म्युझिक व्हिडीओ करायचा आहे".
तसेच याच मुलाखतीमध्ये त्याला विचारण्यात आलं की "मराठीत कुणी पॉप केलं पाहिजे?" यावर उत्तर देताना संजू म्हणाला, "करण औजलानं जर कधी मराठीत केलं तर ते क्रेझी होऊन जाईल". याशिवाय संजूनं हनी सिंगसोबत काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली.
संजू राठोडने आपल्या कलेने मराठी संगीताला एक नवी ओळख दिली आहे. संजूच्या घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पण, मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं. संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये. त्याच्याकडे सेकंड-हँड लॅपटॉप आणि इअरफोन्स होते. यावर त्याने गाणी बनवायला सुरुवात केली, सतत काम करत राहिला आणि अखेरीस संयमी आणि लाजाळू असलेल्या संजूच्या पदरी यश पडलं.