आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:14 IST2025-09-25T16:13:24+5:302025-09-25T16:14:07+5:30
Sameer Wankhede files case against The Bads of Bollywood: समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध मानहानीचा दावा करत २ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'(The Bads of Bollywood)या वेबसीरिजच्या रिलीजनंतर एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, या वेबसीरिजमधील एक दृश्य खोटं, द्वेषयुक्त आणि बदनामी करणारं आहे, जे रेड चिलीजने तयार केलं आहे.
समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे की, ही वेबसीरिज अंमली पदार्थांविरुद्ध तपास करणाऱ्या एजेन्सींना चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने दर्शवते, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. त्यांची प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने हे सर्व हेतुपुरस्सर करण्यात आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित प्रकरण अद्याप बॉम्बे उच्च न्यायालय आणि मुंबईच्या एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, ही सीरिज त्यांची प्रतिष्ठा खराब करणारी असल्याचं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे.
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंचं विडंबन, आता क्रांतीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली- "हा मस्करीचा..."
सीरिजच्या कंटेटनं अनेक नियमांचं केलंय उल्लंघन
याशिवाय, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील एक दृश्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. यात एक पात्र 'सत्यमेव जयते'ची घोषणा दिल्यानंतर बोटाने अश्लील इशारा करते. समीर वानखेडे यांच्या मते, ही कृती १९७१ च्या राष्ट्रीय सन्मान कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे, ज्यामुळे कायदेशीर शिक्षा होऊ शकते. समीर वानखेडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील आशय आयटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहिताच्या अनेक नियमांचं उल्लंघन करते. यातील अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर देशभक्तीच्या भावनांना ठेच पोहोचवते.