"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:38 IST2025-10-08T17:37:21+5:302025-10-08T17:38:44+5:30
सैफ अली खानला झालेली दुखापत पाहून तैमूरने विचारलं,...

"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
अभिनेता सैफ अली खानने नुकतीच 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'च्या शोमध्ये हजेरी लावली. यामध्ये तो अक्षय कुमारसोबत आला होता. काही दिवसांपूर्वीच हा नवा शो प्राईम व्हिडिओवर आला असून दर गुरुवारी २ नवीन पाहुणे या शोमध्ये येतात आणि काजोल-ट्विंकल त्यांच्याशी गप्पा मारतात. यावेळी शोमध्ये सैफने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी सांगितलं. बांद्रा येथील घरी त्या रात्री नक्की काय घडलं होतं याचा संपूर्ण घटनाक्रम त्याने सांगितला.
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल शो'मध्ये सैफ आणि अक्षय कुमारने धमाल केली. एका सेगमेंटमध्ये सैफने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी सांगितले. तो म्हणाला, "मी धावत जेहच्या खोलीत आलो. खोलीत अंधार होता. एक माणूस जेहच्या बेडवर उभा होता. त्याच्या हातात चाकू होता. मी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्याशी दोन हात केले. तो चांगलाच बावचळला होता. त्याच्या हातात दोन चाकू होते आणि तो माझ्यावर सपासप वार करत सुटला. नंतर पायऱ्यांशी आल्यावर तैमूरने मला पाहून विचारलं, 'बापरे रे! तुम्ही आता मरणार का?'. मी म्हणालो, 'नाही, मला नाही वाटत मी मरेन. पण मला पाठीत खूप वेदना होत आहेत. मी मरणार नाही, मी ठीक आहे'.
शोमध्ये सैफने हा घटनाक्रम सांगितल्यानंतर काजोल भावुक झाली. तिने सैफला घट्ट मिठी मारली. सैफ-करीना आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी त्या रात्री जे अनुभवलं ते खरोखरंच भयानक होतं. यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ही घटना घडली. सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. चाकूचा काही इंच तुकडा त्याच्या पाठीत राहिला होता. खूप रक्तस्त्राव होत होता. सुदैवाने शस्त्रक्रिया झाल्यावर सैफ दोनच दिवसात बरा झाला आणि त्याला डिस्चार्ज मिळाला. तर त्याच्या काही दिवसांनी चोराला पोलिसांनी पकडलं. तो बांगलादेशी असल्याचं तपासात समोर आलं.